उजनी जलाशयाच्या पात्रात होतोय बेसुमार वाळूउपसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 12:40 AM2018-12-26T00:40:34+5:302018-12-26T00:40:45+5:30
कुंभारगाव (ता. इंदापूर) येथील उजनी जलाशयाच्या पात्रात दररोज रात्रीच्या वेळी बेसुमार वाळूउपसा होत आहे. रात्री बारा वाजता या ठिकाणी बोटीद्वारे वाळू उपसणयास सुरुवात होते.
पळसदेव : कुंभारगाव (ता. इंदापूर) येथील उजनी जलाशयाच्या पात्रात दररोज रात्रीच्या वेळी बेसुमार वाळूउपसा होत आहे. रात्री बारा वाजता या ठिकाणी बोटीद्वारे वाळू उपसणयास सुरुवात होते. मात्र याकडे महसूल प्रशासनाने तसेच तहसीलदारही दुर्लक्ष करीत आहेत, अशा चर्चा सध्या सुरू आहेत. कुंभारगाव गाव हे फ्लेमिंगो पक्ष्यांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचले आहेत. या ठिकाणी आजमितीला पाच हजार फ्लेमिंगो पक्षी आहेत. मात्र या पक्ष्यांच्या सारंगगारजवळच वाळूउपसा जोरात सुरू आहे. त्यामुळे पक्ष्यांचे वास्तव्य धोक्यात आले आहे. दररोज या ठिकाणी हजारो पर्यटक पक्षी पाहण्यासाठी येत आहेत. परंतु बोटीच्या आवाजामुळे पक्षी सैरभैर फिरताना दिसतात. मध्यरात्रीच्या सुमारास वाळूउपसा करणयास सुरुवात होते. हा वाळूउपसा पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू असतो. कुंभारगाव येथून भरलेल्या वाळूच्या ट्रक डाळज क्रमांक २ मार्गे पुण्याकडे जातात. डाळज गावामध्ये पहाटेच्या वेळी रस्त्यावर पाणीच पाणी दिसते. मात्र याकडे कोणीच लक्ष देत नाही. यापूर्वीचे तहसीलदार श्रीकांत पाटील असताना इंदापूर तालुक्यातील वाळूउपसा बंद झाला होता. याची धास्ती वाळूमाफिया यांनीसुद्धा घेतली होती. परंतु तहसीलदारांच्या बदलीनंतर वाळूमाफियांनी पुन्हा तोंड वर काढले आहे.
याबाबत काही ग्रामस्थांनी सांगितले, की दररोज या ठिकाणी बेसुमार वाळूउपसा सुरू आहे. परंतु याकडे तलाठी, मंडलाधिकारी, तसेच महसूल खात्याचे वरिष्ठ अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. उजनी धरण हे पक्ष्यांचे माहेरघर आहे.
वाळूच्या गाडीला ‘पेट्रोलिंग’
उजनी जलाशयातून ट्रकमध्ये वाळू भरल्यानंतर पुढे मोटारसायकलवर तरुणअसतात. प्रत्येक ठिकाणी ‘लोकेशन’नुसार वाळू भरलेल्या गाड्या जातात. त्यामुळे खरच महसूल प्रशासनातील अधिकारी वाळूउपसा बंद करण्याबाबत ‘तत्परता’ दाखवतात का? प्रश्न निर्माण झाला आहे.
वाळूउपशामुळे पक्ष्यांचे वास्तव्य धोक्यात आले आहे. उजनीच्या काळ्या सोन्यावर अनेकांचा डोळा आहे. परंतु महसूलमधील काही अधिकारी यांच्या मिलीभगतमुळे वाळूमाफिया किंग बनले आहेत. याकामी जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी पक्षीप्रेमींनी केली आहे.
उजनी धरणात दरवर्षी हजारो फ्लेमिंगो पक्षी येत असतात. त्यांना पाहण्यासाठी पर्यटकांचीही गर्दी असते.