....अन् उलगडले खगोलशास्त्रज्ञाचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:16 AM2021-02-18T04:16:04+5:302021-02-18T04:16:04+5:30

पुणे : खगोल भौतिकी क्षेत्रात संशोधन करणारा आणि गुरुत्वाकर्षणाची थिअरी मांडून जागतिक कीर्ती मिळवणारा शास्त्रज्ञ, विज्ञानाचा प्रसार ...

.... Unveiled astronomer's multifaceted personality | ....अन् उलगडले खगोलशास्त्रज्ञाचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व

....अन् उलगडले खगोलशास्त्रज्ञाचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व

googlenewsNext

पुणे : खगोल भौतिकी क्षेत्रात संशोधन करणारा आणि गुरुत्वाकर्षणाची थिअरी मांडून जागतिक कीर्ती मिळवणारा शास्त्रज्ञ, विज्ञानाचा प्रसार करण्यासाठी मराठीत सोप्या भाषेमध्ये वाचनीय कथा लिहिणारा लेखक, विज्ञानवादी असूनही प्राचीन ग्रंथांकडे तर्कशुद्ध विचारसरणीतून पाहाणारा तत्त्वज्ञ आणि प्रश्न विचारण्याची जिज्ञासा मुलींमध्ये उत्पन्न करणारा कुटुंबातला ‘पिता’ अशी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे निर्वाचित अध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाची विविध रूपे मंगळवारी (दि. १६) उलगडली.

डॉ. नारळीकरांच्या लेखनाने मराठी साहित्यात विज्ञानविषयक लेखनाचे दालन तयार झाले आहे. त्यांच्या लेखनाविषयी, जगण्याविषयी दिलखुलास गप्पांचा एक खास ऑनलाइन कार्यक्रम आय-ट्रान्सफॉर्म या संस्थेने आयोजित केला होता. या कार्यक्रमात गणितज्ज्ञ-लेखिका मंगला नारळीकर, राजहंस प्रकाशनचे दिलीप माजगावकर, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, लेखक सुबोध जावडेकर आणि लीलावती नारळीकर सहभागी झाले होते. वसुंधरा काशीकर यांनी त्यांच्याशी संवाद साधला.

प्रा. मिलिंद जोशी म्हणाले की, मराठी लोकांची ही खंत होती की विज्ञानाची साहित्यात दखल घेतली जात नाही. मात्र, डॉ. जयंत नारळीकर यांच्या संमेलनाध्यक्षपदाच्या निवडीने ती आता दूर झाली आहे. दिलीप माजगावकर यांनी लेखक आणि प्रकाशक या नात्याने डॉ. नारळीकर यांच्या समवेतचा २५ वर्षांचा प्रवास सांगितला. डॉ. नारळीकर पाळत असलेली वेळ आणि त्यांची ‘कमिटमेंट’ हे त्यांचे गुण विशेष भावतात, असे ते म्हणाले.

राजहंस प्रकाशनाच्या वतीने डॉ. नारळीकर यांच्या विज्ञान कथा एका खंडात आणि कादंबऱ्या एका खंडात मांडायची मूळ योजना होती. मात्र, कोरोनामुळे काम लांबणीवर पडले. लवकरच त्यांच्या अप्रकाशित विज्ञान कथा आणणार आहोत. भविष्यात त्यांच्या समग्र विज्ञान कथांचा खंड करण्याचा विचार असल्याचे माजगावकर म्हणाले.

डॉ. मंगला नारळीकर म्हणाल्या की, आमच्यात टोकाचे मतभेद होतात, पण ते आम्ही संवादाने सोडवतो. ज्याचे म्हणणे अधिक तर्कशुद्ध असेल ते आम्ही मान्य करतो. धर्म आणि विज्ञानाची सांगड घालताना ‘भगवदगीते’विषयी डॉ. नारळीकर म्हणाले, “भगवदगीता हा मला वाचनीय ग्रंथ वाटतो. परंतु प्रश्न असा आहे की, त्यातील तत्त्वज्ञान तुम्हाला पटते का? त्यातील निष्काम कर्मयोग भावतो. सर्वोत्तम काम करण्याचा प्रयत्न करा. जे काम कराल ते पूर्ण मेहनतीने करा म्हणजे कामाचे समाधान मिळेल. डॉ. मंगला नारळीकर म्हणाल्या, “धर्मग्रंथात दिलेला सल्ला सार्वकालीन असतोच असे नाही. त्यातही न पटणाऱ्या गोष्टी आहेत. सामाजिक मूल्य आणि नियम बदलत राहतात. ग्रंथांचा विचार करताना विवेक बाळगला पाहिजे.”

Web Title: .... Unveiled astronomer's multifaceted personality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.