घोडेगाव येथील क्रांतिवीर होनाजी केंगले स्मृती स्तंभाचे अनावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:12 AM2021-08-19T04:12:41+5:302021-08-19T04:12:41+5:30
क्रांतिवीर होनाजी केंगले यांच्या नावाचा पंचायत समिती आवारात असलेल्या क्रांतिस्तंभावर उल्लेख व्हावा, यासाठी सहा वर्षे क्रांती संघटना असाणे, ...
क्रांतिवीर होनाजी केंगले यांच्या नावाचा पंचायत समिती आवारात असलेल्या क्रांतिस्तंभावर उल्लेख व्हावा, यासाठी सहा वर्षे क्रांती संघटना असाणे, आदिवासी विचार मंच महाराष्ट्र आणि बिरसा ब्रिगेड सह्याद्री आंबेगाव यांनी महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, पुणे जिल्हा परिषद उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, माजी समाजकल्याण सभापती सुभाष मोरमारे, पंचायत समिती आंबेगाव सभापती संजय गवारी यांच्याशी वेळोवेळी पाठपुरावा केला.
बिरसा ब्रिगेड सह्याद्री आंबेगाव यांच्या वतीने आंदोलन छेडण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला. परंतु, प्रशासनाने सर्वतोपरी सहकार्य करून सन २०१६ ते २०२१ अशा सहा वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर आणि आदिवासी विचार मंच बिरसा ब्रिगेड सह्याद्री सातपुडा आंबेगाव, क्रांती संघटना असाणे यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आणि प्रशासकीय इतमामात स्मृतिस्तंभावर या दुर्लक्षित आदिवासी क्रांतिकारकांच्या नावाचा समावेश करून झेंडावंदन करण्यात आले.
या वेळी सभापती संजय गवारी, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे व सर्व पंचायत समिती सदस्य उपस्थित होते. यासाठी शशिकांत करवंदे यांनी पत्रव्यवहार केला. आदिवासी विचार मंच महाराष्ट्र, बिरसा ब्रिगेड आंबेगाव, बिरसा ब्रिगेड सह्याद्री सातपुडा पुणे जिल्हा अध्यक्ष प्रवीण पारधी व सर्व पदाधिकारी उपस्थित राहिले.
या वेळी होनाजी केंगले यांच्या कार्याला मानवंदना देण्यात आली. होनाजी केंगले हे जांभोरी, ता. आंबेगाव येथील होते. सन १८७१ ते १८७६ काळात त्यांनी ब्रिटिशांविरोधात उठाव केला होता. जनतेने त्यांना होनाजी नाईक ही पदवी दिली होती. होनाजींना पकडून देणाऱ्यास इंग्रजांनी एक हजार रुपये इनाम ठेवला होता. इंग्रजांनी मुंबईचा रॉबिनहूड होनाजी केंगले ही पदवी दिली होती. इंग्रजांनी होनाजींना पकडण्यासाठी कर्नल स्कॉट, डब्ल्यू. एफ. सिंक्लेअर, मेजर डॅनियल हे इंग्रज अधिकारी नेमले होते.
होनाजींना मोहपाडा, ता. कर्जत, जि. रायगड येथे १५ ऑगस्ट १८७६ रोजी अटक झाली. इंग्रजांनी लायन हर्टेड होनाजी केंगले असे त्यांचे वर्णन केले होते. इंग्रज सरकारने त्यांना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली होती. अशा या थोर क्रांतिकारक यांचा उल्लेख अहमदनगर गॅझेट पुणे गॅझेटमध्ये आहे, असे यानिमित्त प्रवीण परधी यांनी सांगितले.
घोडेगाव येथे पंचायत समिती कार्यालयाबाहेर असलेल्या क्रांतिस्तंभावर होनाजी केंगले यांच्या नावाचा उल्लेख करून अनावरण प्रसंगी उपस्थित सभापती संजय गवारी व इतर.