पुणे रेल्वे स्टेशनच्या इमारतीचे ९८ व्या वर्षात पर्दापण; जाणून घ्या इतिहास
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2022 08:56 AM2022-07-27T08:56:25+5:302022-07-27T09:04:47+5:30
पुणे रेल्वे स्टेशनवर विशेष कार्यक्रमाचे आयोजन...
पुणे : देशाच्या आर्थिक राजधानीला दक्षिण भारताशी रेल्वे मार्गाने जोडणाऱ्या पुणेरेल्वे स्टेशनच्या इमारतीचे बुधवारी ९८ व्या वर्षात पर्दापण होत आहे. त्यानिमित्ताने पुणे रेल्वे स्टेशनवर विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. केक कापून वाढदिवस साजरा करण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्षा हर्षा शहा यांनी सांगितले.
व्हिक्टोरिया टर्मिनसचा विकास करीत असतानाच लंडनमधील ग्रेट इंडियन पेनीनसुला रेल्वे कंपनीने पुणे जंक्शनचा विकास केला. ब्रिटिश लष्कराच्या दृष्टीने पुणे हे शहर महत्त्वाचे होते. त्यादृष्टीने मार्च १८५८ मध्ये खंडाळा ते पुणे दरम्यान रेल्वे लाईनचे काम पूर्ण झाले. त्यापूर्वी १८५६ मध्ये इथे रेल्वेची इमारत उभी राहिली होती. पुणे जंक्शनवरील गाड्यांची संख्या वाढू लागल्याने नवीन रेल्वे स्टेशनच्या इमारतीची गरज भासू लागली. त्यादृष्टीने १९१५ मध्ये या इमारतीचे डिझाईन तयार करण्यात आले. १९२२ मध्ये जुनी इमारत पाडून नवीन इमारत बांधण्यास सुरुवात करण्यात आली. १९२५ साली ही इमारत उभी झाली. त्यावेळी तिचा खर्च ५ लाख ७९ हजार ६६५ रुपये आला होता.
या नवीन रेल्वे स्टेशनच्या इमारतीचे उद्घाटन करण्यासाठी मुंबईचे गव्हर्नर सर लेस्ली विल्सन हे खास रेल्वे गाडीने पुण्यात आले. २७ जुलै १९२५ रोजी या इमारतीचे उद्घाटन करण्यात आले.
पुणे रेल्वे स्टेशनला हेरिटेज दर्जा देण्यात आला आहे. तसेच सुमारे २० वर्षांपूर्वी रेल्वे बोर्डाने मॉडेल रेल्वे स्टेशन म्हणून मान्यता देऊन गौरविले आहे. मात्र, काळाच्या ओघात पुणे रेल्वे स्टेशनकडे दुर्लक्ष झाले आहे. वाढत्या रेल्वेगाड्यांमुळे आता हे जंक्शन अपुरे पडत आहे. तरीही रेल्वेने पुणे शहरासाठी दुसरे जंक्शन विकसित करण्याकडे दुर्लक्ष केले. हडपसर, खडकी येथे रेल्वेचे जंक्शन विकसित केले जात असले तरी पुणे स्टेशनचा लौकिक आजही कायम असल्याचे हर्षा शहा यांनी सांगितले.