महावितरण कार्यालयात येणाऱ्या वाहनांवर नको कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:12 AM2021-03-16T04:12:03+5:302021-03-16T04:12:03+5:30
शास्त्रीनगर चौकातील नगर रोड महावितरण कार्यालयात विविध कामासाठी तसेच वीज बिल भरण्यासाठी येणाऱ्या वाहनांवर येरवडा वाहतूक विभागाच्या वतीने ...
शास्त्रीनगर चौकातील नगर रोड महावितरण कार्यालयात विविध कामासाठी तसेच वीज बिल भरण्यासाठी येणाऱ्या वाहनांवर येरवडा वाहतूक विभागाच्या वतीने सातत्याने कारवाई करण्यात येत आहे. महावितरण कार्यालयात आलेल्या ग्राहकांना तसेच नागरिकांना त्याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. सध्या महावितरणकडून थकित वीज बिलाबाबत वीज तोड मोहीम चालू असल्यामुळे बिल भरण्यासाठी ग्राहकांची वर्दळ सुरू आहे. तसेच नियमित कामासाठी महावितरण कार्यालयात येणारे ग्राहक व इतर नागरिक कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर वाहने उभी करत असतात. कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना वाहने उभी करण्यासाठी जागा उपलब्ध नसल्यामुळे प्रवेशद्वारावरील फुटपाथवर वाहने उभी करण्यात येतात. वाहतूक शाखेकडून वारंवार वाहनांवर होणाऱ्या दंडात्मक कारवाई मुळे वीज ग्राहक तसेच कार्यालयात येणारे नागरिक यांना त्यामुळे भुर्दंड सहन करावा लागत आहे. तरी या कार्यालयात येणाऱ्या ग्राहकांची तसेच नागरिकांची खातरजमा करून नंतर कारवाई करावी, असे लेखी निवेदनाद्वारे अतिरिक्त कार्यकारी अभियंता नगर रोड उपविभाग यांनी वरिष्ठ पोलिस निरीक्षक वाहतूक शाखा येरवडा यांना कळवले आहे.