उत्तरप्रदेश विकासाच्या वाटेवर, मजूरांचे महाराष्ट्रात येणेही कमी- राम नाईक
By राजू इनामदार | Published: August 13, 2022 06:12 PM2022-08-13T18:12:49+5:302022-08-13T18:15:11+5:30
हे राज्य विकासाच्या वाटेवर आहे....
पुणे: उत्तरप्रदेशची देशात असलेली प्रतिमा बदलते आहे. हे राज्य विकासाच्या वाटेवर आहे, त्यामुळेच आता तिथून महाराष्ट्रात येणाऱ्या मजूरांची संख्या कमी झाली आहे असा दावा त्या माजी राज्यपाल राम नाईक यांनी केला. महाराष्ट्राच्या राज्यपालासंबधी बोलण्याबाबत स्पष्ट शब्दात नकार देत त्यांनी असे करणे योग्य नाही असे सांगितले.
पुण्यात खासगी कार्यक्रमासाठी म्हणून आलेल्या नाईक यांनी शनिवारी दुपारी पत्रकार संघाच्या सभागृहात पत्रकारांबरोबर संवाद साधला. जुलै २०१४ ते जुलै २०१९ या कालावधीत नाईक उत्तरप्रदेशचे राज्यपाल होते. त्या कालावधीत तिथे केलेल्या कामांची सविस्तर माहिती त्यांनी दिली. नाईक म्हणाले, राज्यपाल हे घटनात्मक पद आहे. या पदावरून उत्तरप्रदेशमध्ये चांगले काम करता आले. त्या राज्याचा स्थापना दिवस, शहिद सैनिकांचे पुतळे व स्मृती उद्यान, कुंभ मेळा नियोजन समिती, थोर पुरूषांच्या नावाचे चुकीचे उल्लेख बरोबर करणे, कुष्ठपिडितांनी अर्थसाह्य अशी बरीच कामे तिथे करता आली. राज्य सरकार तसेच विरोधी पक्षांचेही त्यासाठी चांगले सहकार्य मिळाले.
काही गोष्टी नकारात्मकही झाल्या. त्यात प्रामुख्याने राज्यपाल नियुक्त सदस्यांसाठी घटनेत जे निकष दिले आहे, त्यासाठी आग्रही राहणे, लोकायुक्तांची नियुक्ती अशा काही गोष्टींबाबत वाद झाले, मात्र नियम, संकेत. घटनेला अपेक्षित असलेल्या गोष्टी याबाबत आग्रही राहिलो. तेच बरोबर असल्याचे नंतरच्या काळात सिद्ध झाले. त्यामुळेच निवृत्त झाल्यानंतर मागे वळून पाहताना जे केले त्याबद्दल समाधान आहे असे नाईक म्हणाले.
राज्यपाल घटनेने बांधलेले आहे. राजकीय पक्षांबरोबरच त्यांचे राज्यातील जनतेबरोबरही चांगले संवाद सातत्य रहायला हवे. तसेच अपेक्षित आहे. वादविषयांपेक्षाही राज्यात सुरळीतपणे कसा राहिल हे पाहणे महत्वाचे आहे असे मत नाईक यांनी व्यक्त केले. मागासलेले राज्य अशी उत्तरप्रदेशची प्रतिमा आता वेगात बदलते आहे. तिथे उद्योग येत आहेत, नव्याने गुंतवणूक होते आहे. २४ तास वीज, मोठे प्रशस्त रस्ते, पाणी यांची व्यवस्था राज्य करत असल्यामुळे तिथून अन्य राज्यात जाणाऱ्या मजूरांचे प्रमाणही लक्षणीयरित्या घटले आहे असा दावा नाईक यांनी केला. संघाचे अध्यक्ष स्वप्नील बापट यांनी स्वागत केले. सरचिटणीस पांडुरंग सरोदे यांनी आभार व्यक्त केले.