पुण्यात निवडणुका गिरीश बापटांच्या नेतृत्वाखालीच : चंद्रकांत पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2021 03:32 PM2021-06-10T15:32:43+5:302021-06-10T15:43:34+5:30
पुणे भाजप मध्ये सारं आलबेल असल्याचा दावा. पक्ष ताकदीने निवडणूक लढवण्याचा वाढदिवसाचा संकल्प
पुण्याची निवडणूक खासदार गिरीश बापट यांचाच नेतृत्वाखाली लढवली जाईल असे म्हणत त्यांनी पुणे भाजप मध्ये कोणतेही गट नसल्याचा दावा भाजप चे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
पुण्यात आज चंद्रकांत पाटील यांचा वाढदिवसाचा निमित्ताने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.
चंद्रकांत पाटील हे गेल्या विधानसभा निवडणुकीचा वेळी कोथरूड विधानसभा मतदार संघातून लढले.त्यापूर्वी पुणे महापालिका असो की शहर भाजप या सर्वाचे नेतृत्व गिरीश बापट यांचाकडेच असल्याचे चित्र होते.मात्र पाटील पुण्यात आल्यानंतर त्यांनी शहराबरोबरच महापालिकेचा कारभारात देखील लक्ष घालयला सुरुवात केली. त्यानंतर मात्र शहरातली बापट यांची ताकद कमी झाली असल्याची आणि पाटील यांचा कडेच सूत्र गेल्याची चर्चा रंगली होती.
याबद्दल पाटील यांना विचारल्यानंतर पाटील म्हणले ,"आमचा बैठका गुप्त असतात. त्यामुळे तुम्हाला त्याबद्दल कळत नाही. पण बापट हे आमचा सगळ्या बैठकांमध्ये असतात. आणि बापट साहेबांचा नेतृत्वाखाली आगामी महापालिका निवडणुका लढवल्या जातील."
दरम्यान याच वेळी बोलताना पाटील यांनी शरद पवारांनी शिवसेनेचं कौतुक करणे हे मजबूरी का नाम ... असा टोला भाजप चे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे. अर्थात हे करताना प्रत्येक पक्षावर टीका टिप्पणी करणे योग्य नाही असेही ते राष्ट्रवादी बाबत बोलताना म्हणाले आहेत. पाटील म्हणाले ,"राष्ट्रवादी प्रत्येक पक्ष आपापल्या परीने आपली ताकद वाढवायचा प्रयत्न करत असतो. प्रत्येक पक्षावर आपण टीका टिप्पणी करणे योग्य नाही."
सर्व निवडणुका ताकदीने लढवता याव्यात हा संकल्प वाढदिवसाचा निमित्ताने केला असल्याचे देखील पाटील यावेळी म्हणाले.