आगामी मराठी साहित्य संमेलन नाशिकला?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:11 AM2020-12-24T04:11:36+5:302020-12-24T04:11:36+5:30
पुणे : कोरोनाच्या संकटामुळे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यंदा मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात घेण्याचा साहित्य महामंडळाचा विचार आहे. ...
पुणे : कोरोनाच्या संकटामुळे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यंदा मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात घेण्याचा साहित्य महामंडळाचा विचार आहे. यंदाचे संमेलन नाशिकला होणार असल्याची चर्चा साहित्य वर्तुळात सुरू आहे. ९३ व्या साहित्य संमेलनासाठीही नाशिककडून महामंडळाकडे प्रस्ताव पाठवला होता.
जानेवारी महिन्यात उस्मानाबाद येथील साहित्य संमेलनात नाशिक व अंमळनेर येथून साहित्य महामंडळाकडे आगामी संमेलनाच्या आयोजनासाठी निमंत्रणे आली होती. त्यानंतर पुण्यातील सरहद संस्थेने महामंडळाला पत्र पाठवून दिल्लीत घेण्याची तयारी दर्शवली. दिल्लीमध्ये सुमारे ५ लाख मराठी भाषिक असले, तरी दिल्ली आकाशवाणीवरील बंद झालेले मराठी वार्तापत्र, बंद पडलेली मराठी शाळा व दिल्ली विद्यापीठातून वगळलेला मराठी विषय या पार्श्वभूमीवर दिल्लीत मराठी साहित्य संमेलन घेणे कितपत योग्य आहे, याबाबत महामंडळ पदाधिकाऱ्यांच्या मनात शंका असल्याचे समजते.
काही दिवसांपूर्वी सेलू (परभणी) येथूनही साहित्य महामंडळाकडे आगामी संमेलनाच्या आयोजनासाठी प्रस्ताव आला आहे. यापूर्वी १९४२ मध्ये नाशिकला साहित्य संमेलन आयोजित केले होते. त्यानंतर २००५ मध्येही नाशिक येथे डॉ. वसंतराव पवार यांच्या पुढाकाराने संमेलन झाले होते.
---
साहित्य महामंडळाने ३ जानेवारी रोजी घटक, संलग्न आणि समाविष्ट संस्थांची ३ जानेवारी रोजी बैैठक बोलावली आहे. सर्व संस्थांच्या पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतली जातील, संमेलन कोठे होणार, याबाबत आताच बोलणे औैचित्याला धरून होणार नाही. संमेलनस्थळ निश्चित झाल्यावर महिन्याभरात दुसरी बैैठक बोलावली जाणार आहे. ३१ मार्चच्या आत संमेलन व्हावे, असे वाटते.
- कौैतिकराव ठाले-पाटील, अध्यक्ष, साहित्य महामंडळ
---
गेल्या दोन संमेलनांना शासनाकडून ५० लाख रुपयांचे अनुदान मिळाले. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ५-१० लाख रुपयांचेच अनुदान मिळेल, अशी शक्यता आहे. त्यामुळे यंदा अत्यंत मोजक्याच उपस्थितीत साधारण २५ लाख रुपये खर्च करून संमेलन होईल, अशी चर्चा आहे.
--
आगामी साहित्य संमेलन आयोजित व्हावे, अशी महाराष्ट्र साहित्य परिषदेची भूमिका आहे. त्याबाबत ३ जानेवारी रोजी होणाऱ्या बैैठकीत चर्चा होईल.
- प्रा. मिलिंद जोशी, कार्याध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद