आगामी नाट्यसंमेलन ‘नागपूर’ला ?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2018 01:20 AM2018-12-06T01:20:01+5:302018-12-06T01:20:06+5:30
पिंपरी-चिंचवड, उस्मानाबाद, कोल्हापूर, लातूर, नाशिक आणि सोलापूर अशा राज्यभरातील इच्छुक संस्था आणि शाखांकडून तब्बल ९ निमंत्रणे आल्याने संमेलनाला काहीसे ‘अच्छे दिन’ आले होते.
- नम्रता फडणीस
पुणे : आगामी ९९ व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या आयोजनासाठी नागपूर, महाबळेश्वर, चिपळूण, पिंपरी-चिंचवड, उस्मानाबाद, कोल्हापूर, लातूर, नाशिक आणि सोलापूर अशा राज्यभरातील इच्छुक संस्था आणि शाखांकडून तब्बल ९ निमंत्रणे आल्याने संमेलनाला काहीसे ‘अच्छे दिन’ आले होते. मात्र पुढील वर्षीचा निवडणुकीचा हंगाम पाहता सात संस्था आणि शाखांनी प्रस्ताव मागे घेतल्यामुळे आता केवळ लातूर आणि नागपूर या दोन स्थळांचा विचार होणार आहे. परंतु लातूरमधील दुष्काळाची स्थिती पाहता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय नागरी वाहतूक व उड्डाणमंत्री नितीन गडकरी यांच्या ‘नागपूर’लाच संंमेलन होण्याचे संकेत मिळाले आहेत. त्यामुळे ‘नागपूर’ वरच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
यंदाच्या वर्षीपासून शासनाने नाट्यसंमेलनासाठीदेखील ५० लाख रुपयांची तरतूद केल्यामुळे अनेक इच्छुक संस्था व शाखा आयोजनासाठी पुढे सरसावल्या. राज्यभरातून संंमेलनाच्या आयोजनासाठी तब्बल नऊ निमंत्रणे आल्याने नाट्यक्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. या स्थळांची पाहणी करण्यासाठी पाच सदस्यांची समिती गठित करण्यात आली. परंतु स्थळांचा दौरा करण्यापूर्वीच सात संस्था आणि शाखांनी आपले प्रस्ताव मागे घेतले असल्याची माहिती अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह शरद पोंक्षे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. आगामी वर्षात निवडणुकांचा रणसंग्राम सुरू होणार असल्याने कदाचित आयोजनापुढे अडचणींचा डोंगर उभा राहू शकतो, अशी शक्यता वाटल्याने इच्छुक संस्था आणि शाखांनी प्रस्ताव मागे घेतले असावेत, असा अंदाज आहे. लातूरकर आणि नागपूरकर दोघांनाही संमेलन आयोजिण्याची इच्छा आहे. मात्र लातूरमधील दुष्काळाच्या परिस्थितीचाही विचार करावा लागणार आहे. संमेलनाचा दर्जा आम्हाला टिकवून ठेवायचा आहे. ‘नागपूर’ हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय नागरी वाहतूक व उड्डाणमंत्री नितीन गडकरी दोघांचीही मायभूमी असल्याने निवडणुकीच्या काळातही या ठिकाणी संमेलन उत्तम प्रकारे होऊ शकते, असे वाटते. त्यामुळे हेच स्थळ आयोजनासाठी अधिक सोयीचे आहे. येत्या १० डिसेंबरपर्यंत लातूर किंवा नागपूर या दोन स्थळांपैकी एकावर शिक्कामोर्तब केले जाईल, तसेच एप्रिलमध्ये लोकसभा निवडणुका होणार असल्याने नाट्यसंमेलन जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यातच होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
९९ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ नाटककार डॉ. प्रेमानंद गज्वी यांची निवड झाल्यानंतर हे संंमेलन कुठे आणि कधी होणार, याकडे समस्त नाट्यवर्तुळाचे लक्ष लागले आहे. ९८ व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या डामडौल आणि भव्यतेमुळे काहीशा दुर्लक्षित राहिलेल्या नाट्यसंमेलनाला चांगले दिवस आल्याची चर्चा ऐकायला मिळाली.