ससूनमध्ये अद्ययावत यकृत प्रत्यारोपण केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2019 01:11 PM2019-05-06T13:11:28+5:302019-05-06T13:12:22+5:30
ससून रुग्णालयामध्ये अद्ययावत यकृत प्रत्यारोपण केंद्राची उभारणी करण्यात आली आहे.
पुणे : ससून रुग्णालयामध्ये अद्ययावत यकृत प्रत्यारोपण केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. यकृत प्रत्यारोपण झालेल्या दोन रुग्णांच्या हस्ते या केंद्राचे रविवारी लोकार्पण करण्यात आले. फिनोलेक्स व मुकुल माधव फाउंडेशनच्या अर्थसहाय्यातून हे केंद्र उभारण्यात आले आहे.
फिनोलेक्स इंडस्ट्रीजचे संस्थापक प्रल्हाद छाब्रिया यांच्या तिसऱ्या स्मृतीदिनानिमित्त फिनोलेक्स व मुकुल माधव फाउंडेशनने दिलेल्या एक कोटी ३० लाख रुपयांच्या अर्थसहाय्यातून अद्ययावत केंद्र तयार करण्यात आले आहे. केंद्राच्या लोकार्पणप्रसंगी न्युरोफिजिशियन डॉ. आर. एस. वाडिया, फिनोलेक्सचे अध्यक्ष प्रकाश छाब्रिया, फाउंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्वस्त रितु छाब्रिया, होप फाउंडेशनच्या अध्यक्षा अरुणा कटारा, जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता व ससून रुग्णालयाचे माजी अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले, ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर, डॉ. शीतल धडफळे, डॉ. कमलेश बोकील, डॉ. संजीव ठाकूर यांच्यासह प्रल्हाद छाब्रिया यांचा मित्रपरिवार आदी उपस्थित होते. केंद्रामध्ये अत्याधुनिक उपकरणे आणि शस्त्रक्रिया कक्ष उभारण्यात आला आहे.
प्रकाश छाब्रिया म्हणाले, सामान्य रुग्णांसाठी ससून रुग्णालयातील आरोग्यसुविधा उच्च दर्जाच्या व्हाव्यात, या प्रेरणेने आम्ही गेली ३-४ वर्षांपासून सातत्याने काम करीत आहोत. वडिलांच्या दातृत्वपणामुळे भविष्यातही ससूनला सामान्य रुग्णांसाठी लागेल ती मदत करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत.
ससून रुग्णालयाला अत्याधुनिक आणि दर्जेदार आरोग्य सेवांचे केंद्र बनविण्यासाठी छाब्रिया कुटुंबासारखे अनेक दानशूर लोक पुढे येत आहेत. ‘ससून फॉर कॉमनमॅन’ हे सत्यात उतरविण्यासाठी फिनोलेक्स इंडस्ट्रीज व मुकुल माधव फाउंडेशनच्या देणगीचा वाटा मोठा आहे, असे डॉ. चंदनवाले यांनी सांगितले.
--------------------------
आणखी एक कोटीची देणगी
यकृत प्रत्यारोपण केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी प्रकाश छाब्रिया यांनी ससूनला आणखी एक कोटी रुपयांची देणगी जाहीर केली. पुढील ९० दिवसात त्या एक कोटीच्या देणगीचा विनियोग करावा, असे त्यांनी सूचित केले. ही देणगी यकृत प्रत्यारोपण केंद्राच्या रिकव्हरी कक्षाच्या उभारणीसाठी वापरली जाणार असल्याचे रितू छाब्रिया यांनी सांगितले. नवजात शिशू अतिदक्षता विभाग, एन्डोस्कोपी केंद्र, लेझर डेंटल युनिट, विश्रांतीकक्ष अशा सुविधा उपलब्ध केल्यानंतर आता हे केंद्र उभारले आहे. यामुळे गरजू रुग्णांना अल्पदरात यकृत प्रत्यारोपण करणे शक्य होणार असल्याचे छाब्रिया यांनी नमुद केले.