पोलिसांना टीप देतो कळाल्यावर, आरोपीने डोक्यात घातला कोयता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 01:12 PM2021-03-29T13:12:52+5:302021-03-29T13:13:32+5:30
दोन नंबर धंद्याची टीप पोलिसांना दिल्याने मारहाण
पिंपरी : दोन नंबर धंद्याची टीप पोलिसांना देतो, या कारणावरून एकाला मारहाण केली. तसेच भांडण सोडविणाऱ्या तरुणाला लोखंडी कोयता घेऊन डोक्यात वार करून जखमी केले. देहूरोड येथील शिवाजी नगर येथे रविवारी (दि. २८) दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली.
बाबू खाजाप्पा मुगली (वय २५, रा. शिवाजी नगर, देहूरोड) यांनी या प्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दऱ्या साळवे आणि विजय (पूर्ण नाव पत्ता माहीत नाही), या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रविवारी दुपारी साडे तीनच्या सुमारास त्यांच्या घरासमोर थांबले होते. त्यावेळी आरोपी तेथे आले. दोन नंबर धंद्याची टीप पोलिसांना देतो, या कारणावरून आरोपींनी फिर्यादीचा मावस भाऊ दयामण्णा शिवपुरे याला शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. तसेच आरोपी साळवे हा चाकू घेऊन अंगावर धावून आला. फिर्यादी हे भांडण सोडवीत असताना आरोपी विजय याने रिक्षातील लोखंडी कोयता घेऊन फिर्यादीच्या डोक्यात वार करून जखमी केले, असे फिर्यादीत नमूद केले आहे.