‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2025 20:08 IST2025-04-22T20:07:09+5:302025-04-22T20:08:48+5:30
‘दीपस्तंभ मनोबल’च्या १८ विद्यार्थ्यांची बाजी : ७ दिव्यांगांचा समावेश

‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
-उद्धव धुमाळे
पुणे :केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत ‘दीपस्तंभ फाउंडेशन’च्या मनोबल प्रकल्पातील विविध वर्गांमध्ये प्रशिक्षण घेतलेल्या १८ विद्यार्थ्यांनी यश मिळवले असून, यापैकी ७ विद्यार्थी दिव्यांग आहेत. विशेष म्हणजे प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल ठरला आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग (रँक ९१), रवी राज (१८२), प्रणव कुलकर्णी (२५६), पुष्पराज खोत (३०४), श्रीरंग काओरे (३९६), बिरदेव डोणे (५५१), रोहन पिंगळे (५८१), वेदान्त पाटील (६०१), ओंकार खुंटाळे (६७३), अभिजित अहेर (७३४), श्रीतेश पटेल (७४६), तुषार मेंदापारा (७६२), हर्षिता मेहनोत (७६६), संपदा वांगे (८३९), मोहन (९८४), मयंक भारद्वाज (९८५), संकेत शिंगाटे (४७९), दिलीप कुमार देसाई (६०५) यांचा समावेश आहे.
या विद्यार्थ्यांना आएएस आनंद पाटील, आयपीएस वैभव निंबाळकर, आएएस सागर डोईफोडे, आयआरएस धीरज मोरे, पूजा कदम यांच्यासह मिलिंद पाटील यांचे मार्गदर्शन लाभले, अशी माहिती ‘मनोबल’चे प्राध्यापक अमोल लंके यांनी दिली.
मी २०२१ पासून ‘दीपस्तंभ फाउंडेशन’च्या मनोबल प्रकल्पाशी जोडलेलो आहे. दृष्टिदिव्यांग विद्यार्थ्यांसाठी येथे उपलब्ध असलेले ॲक्सेसेबल स्टडी मटेरियल, वैयक्तिक मार्गदर्शन आणि सतत प्रेरणा देणारं अभ्यासपूरक वातावरण यामुळे यूपीएससी परीक्षेच्या प्रत्येक टप्प्यावर मला योग्य दिशा आणि आत्मविश्वास मिळाला. माझ्या या यशाच्या प्रवासात ‘दीपस्तंभ मनोबल’ने दिलेल्या अमूल्य योगदानासाठी मी मनःपूर्वक आभार मानतो.
– मनू गर्ग, यूपीएससी रँकर