mpsc EXAM: नांदेडचा शिवाजी जाकापुरे राज्यात प्रथम
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2018 08:36 PM2018-05-02T20:36:42+5:302018-05-02T21:03:55+5:30
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या विक्रीकर निरीक्षक पदाच्या मुख्य परीक्षेत नांदेडचा शिवाजी जाकापुरे राज्यात प्रथम आला आहे.
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या विक्रीकर निरीक्षक पदाच्या मुख्य परीक्षेत नांदेडचा शिवाजी जाकापुरे राज्यात प्रथम आला आहे. महिलांमधून सांगलीच्या शीतल बंडगर, तर मागासवर्गीयातून ठाण्यातील प्रमोद केदार प्रथम आले आहेत.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने विक्रीकर निरीक्षक पदाच्या २५१ जागांसाठी ७ जानेवारी २०१८ रोजी मुख्य परीक्षा घेण्यात आली होती. त्याचा निकाल बुधवारी दुपारी जाहीर करण्यात आला. या परीक्षेत खुल्या गटाचा कटआॅफ १२३ गुण, अनुसूचित जाती संवर्ग १२३, अनुसूचित जमातीचा ११४, इतर मागासवर्ग (ओबीसी) १२३, विशेष मागास प्रवर्ग १२८, डीटी (ए) १२७, एनटी (बी) १२८, शारीरिक अपंग १३० असा कटआॅफ लागला आहे.
सहायक कक्ष अधिकारी, विक्रीकर निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक संयुक्त पूर्व परीक्षेसाठी राज्यातून ३ लाख ३० हजार ९०९ उमेदवारांनी परीक्षा दिली होती. या परीक्षेतून विक्रीकर निरीक्षक मुख्य परीक्षेसाठी ४ हजार ४३० उमेदवार पात्र ठरले होते. त्यानंतर ७ जानेवारी २०१८ रोजी मुख्य परीक्षा पार पडली. या परीक्षेत १५६ इतके सर्वाधिक गुण मिळवून शिवाजी जाकापुरे राज्यात प्रथम आला आहे.
या निकालात पात्र न ठरलेल्या ज्या उमेदवारांना त्यांच्या उत्तरपत्रिकेतील गुणांची पडताळणी करावयाची आहे, त्यांनी त्यांची गुणपत्रके प्रोफाइलमध्ये पाठविल्याच्या दिनांकापासून १० दिवसांच्या आत आयोगाकडे आॅनलाइन अर्ज करावे असे आयोगाच्या उपसचिव विजया पडते यांनी स्पष्ट केले आहे. विक्रीकर निरीक्षक पदाच्या २५१ जागांसाठी ३ लाख ३० हजार विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते.