UPSC Result : निरक्षर आईने दाखविला यूपीएससीचा मार्ग;डाॅ. अक्षय मुंडे याची यशाला गवसणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 09:00 IST2025-04-23T08:59:20+5:302025-04-23T09:00:21+5:30
काेणतेही क्लास न लावता स्पर्धा परीक्षेत यश मिळविता येते, हे मी आज अनुभवाने सांगू शकताे

UPSC Result : निरक्षर आईने दाखविला यूपीएससीचा मार्ग;डाॅ. अक्षय मुंडे याची यशाला गवसणी
पुणे : अतिशय सामान्य कुटुंबातला जन्म... आई अशिक्षित... काही वर्षांतच वडिलांचे छत्र हरपलेलं... त्यामुळे संपूर्ण प्रवास खडतर. तरीही न डगमगता, न खचता मार्ग काढण्याचे बाळ कडू आईने दिले. म्हणून मी आज यूपीएससी परीक्षेत यश संपादन करू शकलाे. निरक्षर आईनेच मला यूपीएससीचा रस्ता दाखवला, हे मी नम्रपणे नमूद करताे. तसेच काेणतेही क्लास न लावता स्पर्धा परीक्षेत यश मिळविता येते, हे मी आज अनुभवाने सांगू शकताे, हे बाेल आहेत यूपीएससी परीक्षेत देशात ६९९व्या रॅंकने उत्तीर्ण झालेल्या डाॅ. अक्षय संभाजी मुंडे याचे. अक्षय याने पुण्यातील गाेखलेनगर भागात राहून स्पर्धा परीक्षेची तयारी केली आणि यशाला गवसणी घातली आहे.
मी आणि माझी बहीण असे दाेन भावंडं. आम्ही दाेघांनीही भरपूर शिकावे ही आमच्या निरक्षर आईची इच्छा. त्यासाठी पडेल ते कष्ट करण्याची तयारी. आईची ही धडपड मला अभ्यास करण्यासाठी प्रेरणा देत हाेती. तिचं माझी ताकद बनली हाेती, पण आर्थिक परिस्थिती वारंवार डाेकं वर काढत हाेती. घराची जबाबदारी पेलण्याची जाणीव करून देत हाेती. तरीही आई मला विचलित हाेऊ देत नव्हती.
लातूर येथून बीडीएस झाल्यानंतर वर्षभर रुग्णसेवादेखील केली. त्यानंतर मला महात्मा फुले स्काॅलरशिप मिळाली आणि मी पुण्यात येऊन पूर्णवेळ अभ्यास करू शकलाे. कदाचित ही शिष्यवृत्ती नसती तर माझे यूपीएससीचे स्वप्न अपूर्णच राहिले असते. आईचा भक्कम पाठिंबा आणि यूपीएससी परीक्षेचा आग्रह आणि शिष्यवृत्तीमुळे मिळालेला आर्थिक आधार यामुळे मी आज यूपीएससी उत्तीर्ण हाेऊ शकलाे, असे अक्षय मुंडे याने नम्रपणे नमूद केले.