#UPSC result : 'स्वप्न आपोआप पाठलाग करतील, फक्त जिद्द सोडू नका'
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2019 08:32 PM2019-04-05T20:32:24+5:302019-04-05T20:47:05+5:30
यश मिळाल्यानंतर ते डोंगराएवढे दिसत असले तरी त्यामागचे कष्ट हे समुद्राएवढे असतात. लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत यश देशात १६व्या आलेल्या तृप्ती अंकुश दोडमिसे यांची ही कहाणी अशीच आहे.
पुणे : यश मिळाल्यानंतर ते डोंगराएवढे दिसत असले तरी त्यामागचे कष्ट हे समुद्राएवढे असतात. लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत देशात १६व्या आलेल्या तृप्ती अंकुश दोडमिसे यांची ही कहाणी अशीच आहे. ध्येय निश्चित झाल्यावर जिद्दीने, कष्टाने त्याचा पाठलाग करणाऱ्या तृप्ती यांचा आदर्श सर्वांनीच घ्यावा असा आहे.
तृप्ती या लहानपणापासून अतिशय हुशार आहेत. त्यांचे आई-वडील प्राथमिक शिक्षक. त्यामुळे शिक्षणाचे बाळकडूच मिळालेल्या त्यांना कधीही अभ्यासासाठी बोलणी बसली नाहीत. मनापासून अभ्यासाची आवड असणाऱ्या तृप्ती १० वी आणि १२ वी या दोनही वर्षी बोर्डात अनुक्रमाने १० व्या आणि ११व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या. त्यानंतर २०१०साली त्यांनी प्रोडक्शन इंजिनिअरिंग करत प्रसिद्ध पुणे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (पीसीओई) मधून पदवी घेतली. मात्र त्यानंतर नोकरी करून तुलनेने चारचौघांप्रमाणे आयुष्य जगण्याऐवजी त्यांनी स्पर्धा परीक्षेचा खडतर मार्ग जोपासला. त्यातही त्यांना दुसऱ्याच प्रयत्नात यश आले आणि पुण्यात त्या सहाय्यक विक्रीकर आयुक्त म्हणून रुजू झाल्या.
दरम्यानच्या काळात त्यांची जीवनगाठ सुधाकर नवत्रे यांच्याशी बांधली गेली. लग्नानंतरही क्लास वन अधिकारी आणि विशेषतः प्रशासकीय सेवा क्षेत्राचे स्वप्न त्यांची पाठ सोडत नव्हते. दिवसभर १० ते ६ नोकरी आणि सकाळ- संध्याकाळ मिळून चार ते पाच तास अभ्यास असा त्यांचा दिनक्रम होता. या काळात गृहिणी म्हणून घरच्या जबाबदाऱ्याही त्या यशस्वीपणे पार पाडत होत्याच. पण अखेर त्यांच्या कष्टांचे चीज झाले आणि दुसऱ्या प्रयत्नात त्या देशाच्या क्षितिजावर चमकल्या. त्यांच्या या यशाने दोडमिसे आणि नवत्रे कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे.
या सर्व अनुभवाबद्दल तृप्ती म्हणतात, 'यशाचा आनंद तर खूप आहे. पण त्यात मी एकटी नाही तर माझ्या सासर आणि माहेरच्या मंडळींचा आणि विशेषतः सुधाकर यांचा मोठा वाटा आहे. त्यांच्या पाठिंब्यावर मी इथंपर्यंत पोचू शकले. मी निराश होऊन अभ्यास सोडणाऱ्या मुलांना एवढंच सांगेन की,तुम्ही चिकाटी आणि जिद्द सोडू नका, स्वप्न आपोआप तुमचा पाठलाग करत भेटायला येतील'.