यूपीएससीच्या विद्यार्थ्यांनी उलगडली यशोगाथा

By admin | Published: June 3, 2017 02:53 AM2017-06-03T02:53:46+5:302017-06-03T02:53:46+5:30

यूपीएससी परीक्षा म्हणजे कसोटी क्रिकेट आहे, इथं यश अपयशात टिकून राहणं महत्त्वाचं ठरतं... प्रशासकीय अधिकारी का व्हायचंय, हे

UPSC students unleash success stories | यूपीएससीच्या विद्यार्थ्यांनी उलगडली यशोगाथा

यूपीएससीच्या विद्यार्थ्यांनी उलगडली यशोगाथा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : यूपीएससी परीक्षा म्हणजे कसोटी क्रिकेट आहे, इथं यश अपयशात टिकून राहणं महत्त्वाचं ठरतं... प्रशासकीय अधिकारी का व्हायचंय, हे एकदा पक्कं ठरवून मगच यूपीएससी परीक्षेला सुरुवात करा... हार्ड वर्क आणि स्मार्ट वर्क यांचा मेळ घाला... आयएएस बनून जिल्हयाचा प्रमुख बनणं यासारखं दुसरं यश असूच शकत नाही, त्यामुळे कसून तयारी करा, असे कानमंत्र देत यूपीएससी परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांनी त्यांची शुक्रवारी यशोगाथा उलगडली.
द युनिक अ‍ॅकॅडमीच्या वतीने यूपीएससी परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन गणेश कला, क्रीडा मंदिर येथे करण्यात आले होते. या वेळी महापालिकेच्या अतिरिक्त आयक्त शीतल उगले या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. युनिक अ‍ॅकॅडमीचे संचालक तुकाराम जाधव, मल्हार पाटील, भूषण देशमुख, प्रवीण चव्हाण, मनोहर भोळे, मंगेश खराटे, अमर जगताप या वेळी उपस्थित होते. यूपीएससी परीक्षेकडे का वळलो, त्याचा अभ्यास कसा केला, त्यासाठी काय संघर्ष करावा लागला, प्रतिकूल परिस्थितीमध्ये मात करीत कसे यशस्वी ठरलो आदी विद्यार्थ्यांनी त्यांच्या मनोगतातून मांडले.
यूपीएससीमध्ये राज्यातून पहिली आलेली विश्वांजली गायकवाड म्हणाली, ‘‘तुम्हाला यूपीएससी परीक्षा का करायची आहे, ते पहिल्यांदा निश्चित करा. सगळं लिहून काढा, हवं तर कुणाला सांगू नका. मात्र तुम्ही हे का करताय, ते तुम्हाला पूर्णपणे स्पष्ट असलं पाहिजे. त्यानंतर आपण नाहक यामध्ये अडकलो नाही ना, असे वाटत नाही. यूपीएससी परीक्षेचा अभ्यास करताना वेळेचे नियोजन करणं याला फार महत्त्व आहे. त्याचबरोबर लेखी परीक्षेमध्ये स्वत:ची मते मांडणे अपेक्षित असते.’’
दिनेश गुरव म्हणाला, ‘‘इंजिनिअरिंग करत असतानाच यूपीएससी करायचे निश्चित केले होते. त्यानुसार परीक्षेच्या तयारीसाठी स्वत:ला झोकून दिले. दुसऱ्या प्रयत्नांमध्ये यश आले.’’
किरण खरे म्हणाला, ‘‘आयएएस अधिकारीपदामध्ये सत्ता आहे. देशातला हा सर्वात बेस्ट जॉब आहे. त्यामुळे स्वत:ला ओळखून या परीक्षेची तयारी सुरू करावी.’’
तुकाराम जाधव म्हणाले, ‘‘युनिकला नुकतीच दहा वर्षे पूर्ण झाली. प्रत्येक वर्षी आम्ही यूपीएससीच्या निकालानंतर यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करतो. कारण प्रत्येक निकालानंतर वेगवेगळया सक्सेस स्टोरी पुढे येत असतात.’’
या वेळी अजय पवार, यशवंत सोनवणे, गोरख भामरे, आशिष पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. महेश शिरापूरकर यांनी सूत्रसंचालन केले.

...हे म्हणजे यश असतं
जळगावच्या आशिष पाटील याने त्याच्या मनोगतामध्ये धमाकेदार बॅटिंग केली. पुण्यात येऊन प्रतिकूल परिस्थितीमध्ये कसा झगडा करीत यश मिळविलं ते त्याने सांगितलं. तो म्हणाला, ‘‘कालपर्यंत बसचे दोन रुपये तिकीट वाचविण्यासाठी कल्पना लढवायचो. एकेका रूममध्ये चार-पाच जण दाटीवाटीने राहायचो. साधा ७ रुपयांचा चहा जास्त पाणी घालून मिळाला तरी चरफडायचो. मात्र यूपीएसीच्या निकालानंतर रात्रीतून सारं चित्र बदलून गेलं. आज २० रुपयांचा महागडा चहा पिला तरी त्याचे फार वाईट वाटल नाही. हे म्हणजे यश असतं.’’

Web Title: UPSC students unleash success stories

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.