उरावडे अग्नितांडव; मालक व सरकारी अधिकारीच दोषी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:14 AM2021-07-07T04:14:12+5:302021-07-07T04:14:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे: उरावडे (ता. मुळशी) येथील एसव्हीएस ॲक्वा टेक्नॉलॉजीज कंपनीमधील आगीसाठी कंपनी मालक व सुरक्षेच्या तपासणीची जबाबदारी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे: उरावडे (ता. मुळशी) येथील एसव्हीएस ॲक्वा टेक्नॉलॉजीज कंपनीमधील आगीसाठी कंपनी मालक व सुरक्षेच्या तपासणीची जबाबदारी असलेले अधिकारीच दोषी असल्याचा अहवाल कामगार संघटनांच्या संयुक्त कृती समितीने जिल्हाधिकाऱ्यांकडे सोमवारी सादर केला.
या आगीत (७ जून, २०२१) १७ कामगार होरपळून मृत्युमुखी पडले होते. घटना जुनी झाल्यावर दोषींवर कारवाई करण्याचे बाजूला पडेल या शंकेने विविध कामगार संघटनांनी स्वतःच एक संयुक्त कृती समिती स्थापन केली. घटनास्थळाची पाहणी करून, काही प्रत्यक्षदर्शींबरोबर बोलून या समितीने एक अहवाल तयार केला.
त्याचे निष्कर्ष समजू शकले नाहीत, मात्र कारखाना सुरक्षा अधिनियमांचे वर्षानुवर्षे मालक व्यवस्थापनांकडून जाणीवपूर्वक उल्लघंन होत आले आहे, या कामाची जबाबदारी असलेले सरकारी अधिकारी मालकाबरोबर संगनमत करून होते असा ठपका अहवालात ठेवला असल्याचे समजते.
जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांना हा अहवाल देण्यात आला. त्यातील मुद्दे राष्ट्रीय पातळीवरील हरित लवादाने जी समिती नेमली आहे, त्यांच्यासमोर तसेच महाराष्ट्र सरकारसमोर सादर करावेत अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली. अजित अभ्यंकर(सिटू), मनोहर गडेकर, कैलास कदम, (इंटक), अनिल पाटील (श्रमिक एकता महासंघ), रघुनाथ कुचिक (भारतीय कामगार सेना), वसंत पवार (सिटू), किशोर ढोकले, अरुण बोऱ्हाडे, (राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघ), चंद्रकांत तिवारी (विमा कामगार संघटना) यांचा समितीत समावेश होता.