शहरांसाठी समूह विकास गरजेचा, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांची सूचना
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2025 14:53 IST2025-02-01T14:51:19+5:302025-02-01T14:53:08+5:30
राज्यात ज्या महापालिका आणि नगरपालिकांचे विकास आराखडे रखडले आहेत, ते तातडीने मान्य करा, अशा सूचना नगरविकास विभागाला केल्या

शहरांसाठी समूह विकास गरजेचा, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांची सूचना
पुणे : शहरांची झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे अस्तित्वातील इमारतींचा स्वतंत्र विकास न करता त्यांचा समूह विकास अर्थात क्लस्टर विकास केल्यास त्यांना मोकळ्या जागा, बागा, मैदाने यासारख्या सुविधा पुरविल्या जाऊ शकतात. नगर नियोजन योजनांची (टीपी स्कीम) अंमलबजावणी शहरांलगतच्या भागात करता येईल. यासाठी शहर आराखडा विभाग (अर्बन डिझाइन विंग) स्थापन करण्याचे नगर नियोजन विभागाला सांगण्यात आले आहे. सल्लागारांच्या माध्यमातून शहरांचा नियोजनबद्ध विकास करता येईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. तसेच राज्यात ज्या महापालिका आणि नगरपालिकांचे विकास आराखडे रखडले आहेत, ते तातडीने मान्य करा, अशा सूचना नगरविकास विभागाला केल्या आहेत.
नगररचना व मूल्यनिर्धारण विभागाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित नगर रचना परिषदेचे उद्घाटन शिंदे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी पालकमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, खासदार श्रीरंग बारणे, आमदार विजय शिवतारे, नगर रचना विभागाचे अतिरिक्त सचिव असिमकुमार गुप्ता, नगररचना संचालक अविनाश पाटील, पीएमआरडीएचे महानगर नियोजनकार सुनील मरळे, सहसचिव प्रतिभा भदाणे उपस्थित होते.
पवार म्हणाले, शहराचा विकास आराखडा मंजूर होण्यास विलंब होत असल्याचे सांगून संबंधित भागांचा विकास ठप्प होतो. त्यामुळे विकास आराखड्यांऐवजी नगर रचना योजना करण्यावर भर दिला पाहिजे, अशी सूचना त्यांनी केली.
शिंदे म्हणाले, “मुंबई व ठाण्यात क्लस्टर विकासातून काम सुरू झाले आहेत. त्यात एमएमआरडीए, म्हाडा, सिडको महापालिका अशा संस्था सहभागी झाल्या आहेत. आता ही योजना पुण्यातही राबविण्याची गरज असून त्यात महापालिका पीएमआरडीए यांनी सहभागी व्हावे. या क्लस्टर विकासातून मोठ्या प्रमाणावर मोकळ्या जागा, बागा, मैदाने उपलब्ध होणार आहेत. या क्लस्टर विकासातील त्रुटी दूर केल्याने सामान्य नागरिकांना फायदा होणार आहे. अविनाश पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले. यावेळी विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या स्पर्धेतील विजेत्यांना माननीय यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले.