रिकाम्या जागांवर नगरविकास योजना हवी
By admin | Published: February 3, 2016 01:44 AM2016-02-03T01:44:27+5:302016-02-03T01:44:27+5:30
शेती झोन निघून निवासी झोन झालेल्या अनेक जागा उपनगरांमध्ये आहेत. त्या सर्व जागांवर नगर विकास योजना जाहीर करावी,
पुणे : शेती झोन निघून निवासी झोन झालेल्या अनेक जागा उपनगरांमध्ये आहेत. त्या सर्व जागांवर नगर विकास योजना जाहीर करावी, अशी मागणी काँग्रेसने महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे केली आहे. एकाच विशिष्ट परिसराचा विकास करण्याऐवजी हे काम करावे, त्यामुळे संपूर्ण शहराचा विकास होईल, असे प्रशासनाला सुचवण्यात आले आहे.
काँग्रेसचे शहराध्यक्ष अभय छाजेड यांनी याबाबत आयुक्तांना पत्र दिले आहे. शेतीझोन असेल, तर त्या परिसरातील जागांवर कसलेही बांधकाम करता येत नाही. शहर विकास आराखडा तयार करताना राज्य सरकार, महापालिका यांच्याकडून काही ठिकाणी असलेले शेतीझोन काढून तिथे निवासी झोन, असा बदल करण्यात येतो. गेल्या काही वर्षांत शहराच्या आसपासच्या उपनगरांमध्ये यामुळे काही हजार एकर जागा रिकामी म्हणजे निवासी झोन झाली आहे. त्या सर्व जागांवर महापालिकेने नगरविकास योजना जाहीर केली, तर बांधकाम व्यावसायिकांकडून त्या जागांचा विकास करता येईल, असे छाजेड यांचे म्हणणे आहे.
नगरविकास योजना जाहीर झाल्यानंतर त्या जागेवर निवासी किंवा व्यावसायिक बांधकाम करता येऊ शकते. मात्र, ते करताना बांधकाम व्यावसायिकाला रस्त्यांसाठी १५ टक्के, उद्याने व अशा प्रकारच्या सोयीसुविधा त्या परिसरात देता याव्यात, यासाठी ३० टक्के अशी एकूण जागेच्या किमान ४५ टक्के जागा सोडावी लागते. ही जागा महापालिकेच्या मालकीची होते. त्यासाठी महापालिकेला काहीही पैसे द्यावे लागत नाहीत. मुंढवा, येरवडा-संगमवाडी, लोहगाव, पाषाण याठिकाणी शेती झोन बदलून निवासी झोन झालेली किमान २ हजार एकर जागा सध्या उपलब्ध आहे. या जागांवर महापालिकेने नगरविकास योजना जाहीर करावी, अशी मागणी काँग्रेसच्या वतीने छाजेड यांनी केली आहे. (प्रतिनिधी)