पुण्यातून निवडणूक लढवण्याचा आग्रह; शरद पवारांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2024 10:10 AM2024-03-20T10:10:54+5:302024-03-20T10:13:48+5:30
आमच्या पक्षाचे काही लोक इच्छुक असून आधी बाहेर गेले होते, आता पुन्हा परत येण्याच्या तयारीत आहेत
पुणे: कार्यकर्त्यांकडून मला सातारा, माढा या मतदारसंघांमधून निवडणूक लढवण्याचा आग्रह होतो. पुण्यातील कार्यकर्ते देखील मी पुण्यातून लढावे म्हणून आग्रही आहेत, अशी माहिती खुद्द ज्येष्ठ शरद पवार यांनीच मंगळवारी पुण्यातील त्यांच्या निवासस्थानी दिली. शिवसंग्रामचे दिवंगत नेते विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी त्यांची भेट घेतली.
मेटे यांना बीडमधून भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्या विरोधात उभे करण्याचा प्रयत्न सुरू आहे. शरद पवार मंगळवारी त्यांच्या मोदी बागेतील निवासस्थानी होते. त्यांच्या पक्षाच्या, तसेच मित्र पक्ष शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेत्या सुषमा अंधारे, तसेच ज्योती मेटे व अन्य काहीजणांनी त्यांची भेट घेतली. पत्रकारांबरोबरही पवार यांनी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी आपल्याला पुण्यातून निवडणूक लढवण्याचा आग्रह होत असल्याची माहीती दिली. माढा, सातारा इथूनही कार्यकर्ते मागणी करतात; मात्र आतापर्यंत १४ निवडणुका लढवल्या. आता निवडणूक लढवणार नाही, असे मागेच जाहीर केले आहे. त्यात बदल करावे असे वाटत नाही, असे ते म्हणाले.
ज्योती मेटे यांनी भेट घेतली. त्यांचे काही म्हणणे आहे ते त्यांनी मांडले. तिथे आमच्या पक्षाचे काही लोक इच्छुक आहेत. काहीजण आधी बाहेर गेले होते. आता पुन्हा परत येण्याच्या तयारीत आहेत. या जागेवर कोणाला उमेदवारी द्यायची, असा काही निर्णय पक्षस्तरावर अद्याप झालेला नाही, असे पवार यांनी सांगितले.