आरोग्य विभागातील रिक्त पदे तातडीने भरा, खा. सुप्रिया सुळेंची मागणी
By ज्ञानेश्वर भोंडे | Published: October 5, 2023 05:59 PM2023-10-05T17:59:53+5:302023-10-05T18:00:46+5:30
मनुष्यबळाअभावी सेवेवर विपरीत परिणाम...
पुणे : आवश्यक मनुष्यबळच उपलब्ध नसल्याने आरोग्य यंत्रणेची कार्यक्षमता कमी झाली आहे. त्याचा परिणाम आरोग्य सेवेवर होत असून आरोग्य खात्यात तातडीने सर्व रिक्त पदांची भरती करण्यात यावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य शासनाकडे केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खासदार सुळे यांनी याबाबत पत्र लिहिले असून तसे ट्विटही त्यांनी केले आहे. मुख्यमंत्र्यांनी वैयक्तिक रित्या लक्ष घालून तातडीने हा प्रश्न सोडवावा, असे त्यांनी या पत्रात म्हटले आहे. राज्यातील शासकीय रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि एकंदर आरोग्य खात्यामध्ये डॉक्टर, परिचारिका, तंत्रज्ञ आणि इतर सपोर्टींग स्टाफची कमतरता आहे. नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि ठाणे येथे नुकत्याच घडलेल्या घटनांमधून हे स्पष्ट होत आहे, असे सुळे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
आवश्यक मनुष्यबळच उपलब्ध नसल्याने आरोग्य यंत्रणेची कार्यक्षमता कमी झाली आहे. याचा परिणाम आरोग्य सेवेवर झाला आहे. याबाबत माध्यमातून दररोज बातम्या येत आहेत. ठाणे, नांदेड, छत्रपती संभाजी नगर, नागपूर येथील नुकत्याच घडलेल्या घटनांनी यावर शिक्कामोर्तब केले आहे. हे लक्षात घेता राज्य सरकारने तातडीने आरोग्य खात्यातील सर्व रिक्त पदे तातडीने भरणे आवश्यक आहे. तरी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वैयक्तिक लक्ष घालून याबाबत तातडीने कार्यवाही करावी, असे त्यांनी आपल्या पत्रात पुढे नमूद केले आहे.