Pune: उरळीकांचन पोलिसांची गावठी दारू भट्टीवर कारवाई, लाखोंचा मुद्देमाल जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2024 11:22 AM2024-02-27T11:22:48+5:302024-02-27T11:34:42+5:30
उरुळी कांचन परिसरात कोरेगाव गावच्या हद्दीमध्ये राजेंद्र चौधरी यांच्या नर्सरीमध्ये गावठी हातभट्टी दारूचा साठा मोठ्या प्रमाणात जप्त केला...
उरुळी कांचन (पुणे) : उरूळी कांचन परिसरामध्ये पोलीस अवैध धंद्यावर मोठी कारवाई सुरू केली आहे. यामध्ये मागील काही दिवसापासून अवैध दारू विक्री, मटका, जुगार, अवैध शस्त्र बाळगणे अशा विविध स्वरूपाचे गुन्हे करणाऱ्यांवर कारवाई केली आहे.
दि. (२६) रोजी उरुळी कांचन परिसरात कोरेगाव गावच्या हद्दीमध्ये राजेंद्र चौधरी यांच्या नर्सरीमध्ये गावठी हातभट्टी दारूचा साठा मोठ्या प्रमाणात जप्त केला. गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाल्यावर पोलिसांनी छापा टाकून ३५० लिटर कच्चे रसायन तसेच गावठी हातभट्टीची तयार दारू ९ हजार १५ लिटर असा एकूण ६ लाख ४५ हजरांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्याप्रकरणी राजेंद्र चौधरी व जमीन मालक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्याचप्रमाणे शिंदवणे व सोरतापवाडी गावच्या हद्दीत कॅनॉलच्या कडेला गावठी हातभट्टी विक्री करत असल्याचे माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी त्याठिकाणी छापा टाकला असता कॅनलच्या कडेला गावठी हातभट्टीची तयार दारू करण्यासाठी भट्टी चालू असल्याचे दिसले. त्या ठिकाणी ५००० लिटर कच्चे व जळके रसायन तसेच गावठी हातभट्टीची तयार दारू ५२५ लिटर असा एकूण रुपये २ लाख ४२ हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कच्चे रसायन जागीच नष्ट करण्यात आले. गावठी हातभट्टी मानवी आरोग्यासाठी धोकादायक आहे. दारू तयार करणारी महिला कयादू राठोड ही पोलिसांची चाहूल लागतात पळून गेली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुधीर पाडूळे हे करीत आहेत.