उरुळी कांचन ग्रामपंचायत : सरपंचावरील अविश्वास ठराव मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2018 12:47 AM2018-07-08T00:47:21+5:302018-07-08T00:47:32+5:30
उरुळी कांचन ग्रामपंचायतीच्या इतिहासात पहिल्यांदाच सरपंचावर अविश्वास ठराव मंजूर झाला आहे. १७ सदस्यीय ग्रामपंचायतीत सरपंच अश्विनी राजेंद्र कांचन यांच्या विरोधात दाखल झालेला अविश्वास ठराव १४-० अशा फरकाने मंजूर झाल्याची माहिती पीठासीन अधिकारी तथा हवेलीचे तहसीलदार प्रशांत पिसाळ यांनी दिली.
उरुळी कांचन - उरुळी कांचन ग्रामपंचायतीच्या इतिहासात पहिल्यांदाच सरपंचावर अविश्वास ठराव मंजूर झाला आहे. १७ सदस्यीय ग्रामपंचायतीत सरपंच अश्विनी राजेंद्र कांचन यांच्या विरोधात दाखल झालेला अविश्वास ठराव १४-० अशा फरकाने मंजूर झाल्याची माहिती पीठासीन अधिकारी तथा हवेलीचे तहसीलदार प्रशांत पिसाळ यांनी दिली.
सरपंच अश्विनी राजेंद्र कांचन मात्र यावेळी गैरहजर राहिल्या, हे महत्त्वाचे आहे. ग्रामपंचायतीच्या १७ पैकी १३ सदस्यांनी सरपंचांविरोधात अविश्वास ठरावाचा प्रस्ताव तहसीलदार पिसाळ यांच्याकडे दिला होता. त्यानुसार पिसाळ यांनी ग्रामपंचायत कार्यालयात शनिवारी (ता. ७) विशेष बैठक बोलाविली होती. या बैठकीत गुप्त मतदान घेण्याची मागणी लेखी स्वरूपात एका सदस्याने केली होती.
त्याला अनुसरून घेण्यात आलेल्या गुप्त मतदान प्रक्रियेत १६ सदस्य हजर होते, पैकी १४ सदस्यांनी ठरावाच्या बाजूने मतदान केले, तर दोन सदस्यांनी कोरी मतपत्रिका टाकून मतदानापासून अलिप्त राहणे पसंत केले. महिला सरपंच असल्याने नियमानुसार ३/४ सदस्यांचा म्हणजे, १२ सदस्यांचा अविश्वास ठरवाला पाठिंबा आवश्यक होता. तो १३ सदस्यांनी सह्या केल्याने पूर्ण झाला होता. आज प्रत्यक्षात १४ सदस्यांनी त्या बाजूने मतदान करून त्यांच्यावरील अविश्वास अधोरेखित केला.
आजच्या अविश्वास ठरावावर निर्णय घेण्याची बैठक अतिसंवेदनशील वातावरणात झाली; मात्र सहायक पोलीस निरीक्षक श्रीकांत इंगवले यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने चोख बंदोबस्त ठेवत कोणताही अनुचित प्रकार घडू दिला नाही. मंडलाधिकारी दीपक चव्हाण व ग्रामविकास अधिकारी के. जी. कोळी यांनी पीठासीन अधिकारी प्रशांत पिसाळ यांना मदत केली.
उरुळी कांचन ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंच पदाची निवडणूक २४ आॅगस्ट २०१५ रोजी झाली होती. यामध्ये ठरल्याप्रमाणे इतर सदस्यांना भविष्यात या पदावर काम करण्याची संधी देण्याचे ठरले होते, अशी चर्चा नाराज सदस्यांमध्ये होती.
प्रत्यक्षात तसे न घडल्याने मागील वर्षभरापासून सर्व सदस्यांमध्ये अंतर्गत गटबाजी, बंडाळी सुरू होती. याचाच परिपाक म्हणून संतोष हरिभाऊ कांचन या सत्ताधारी गटाच्या असंतुष्ट सदस्यांच्या नेतृत्वाखाली एकूण १७ पैकी १५ सदस्य म्हणजे सरपंच - उपसरपंच सोडून बाकीचे सर्व सदस्य एकत्र आले होते. त्यापैकी १३ सदस्यांनी सह्या करून सोमवार, दि. २ जुलै रोजी सरपंचांवर सदस्यांना विचारात न घेता एकतर्फी निर्णय घेणे, सदस्यांना तुच्छतेची वागणूक देणे, सरपंच पती राजेंद्र बबन कांचन यांची ग्रामपंचायत कारभारात ढवळाढवळ व सरपंचाच्या परस्पर निर्णय घेणे या कारणांसाठी अविश्वास ठराव दाखल केला होता. हा ठराव दाखल केलेल्या ग्रामपंचायत सदस्यांमध्ये संतोष हरिभाऊ कांचन, सुनील दत्तात्रेय कांचन, भाऊ कांचन, सागर कांचन, जितेंद्र बडेकर, राजेंद्र जगताप,
रोहित ननावरे, राजश्री वनारसे, सारिका मुरकुटे, समता जगताप, सारिका लोणारी, कविता खेडेकर, ज्योती पाथरकर या सदस्यांचा समावेश होता. यावेळी पिसाळ म्हणाले की, या निर्णयाविरुद्ध जिल्हाधिकारी यांच्याकडे अपिलात जाण्यासाठी ७ दिवसांची मुदत सदरच्या पदाधिकाºयाला मिळते, त्यावर ३० दिवसांच्या आत जिल्हाधिकारी यांनी निर्णय घेणे अपेक्षित असून, नंतरच नवीन पदाधिकारी निवडीची प्रक्रिया सुरू करावी लागते.