उरुळी कांचनला होणार स्वतंत्र पोलीस ठाणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:10 AM2021-01-04T04:10:52+5:302021-01-04T04:10:52+5:30
उरुळी कांचन : जिल्हा (ग्रामीण) पोलीस दलातील लोणी काळभोर, लोणी कंद, हवेली या तीन पोलीस ठाण्याबरोबरच, शहर पोलीस ...
उरुळी कांचन : जिल्हा (ग्रामीण) पोलीस दलातील लोणी काळभोर, लोणी कंद, हवेली या तीन पोलीस ठाण्याबरोबरच, शहर पोलीस दलातील हडपसर, चंदननगर व चतु:श्रुंगी या सहा पोलीस ठाण्याचे विभाजनाबाबत उद्या सोमवारी मंत्रालयात निणर्णय होणार आहे. नव्याने निर्माण होणारे उरुळी कांचन पोलीस ठाणे मात्र ग्रामीण पोलीस दलातच राहणार आहे. या निर्णयाबाबतचे पत्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सचिव अविनाश सोलवट यांनी एका पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.
जिल्हा (ग्रामीण) पोलीस दलातील लोणी काळभोर व लोणी कंद ही दोन पोलीस ठाणी शहर पोलीस दलात सामाविष्ठ होण्याबाबत मागील चार महिन्यांपासून चर्चा चालू होती. तसेच उरूळी कांचनाला नवे पोलीस ठाणे विचाराधीन असचे वृत्त ‘लोकमत’ने ३ डिसेंबरला दिले होते. मात्र, याला आमदार अशोक पवार यांच्याबरोबरच, पूर्व हवेलीमधील अनेक राजकीय नेत्यांचा विरोध असल्याने, वरील निर्णय होऊ शकला नव्हता. मात्र खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच याबाबत पुढाकार घेतल्याने, लोणी काळभोर, लोणी कंद, हवेली, हडपसर, चंदननगर व चतु:श्रुंगी या सहा पोलीस ठाण्याचे विभाजन होण्याबरोबरच लोणी काळभोर पोलीस ठाणे येत्या २६ जानेवारीपासून शहर पोलिसात समाविष्ट होण्याबाबत शिक्कामोर्तब झाले आहे. याबाबत जिल्हा (ग्रामीण) पोलिस दलातील एका वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर, लोणी कंद, हवेली, हडपसर, चंदननगर व चतुश्रुगी या सहा पोलिस ठाण्याचे विभाजन करण्याबाबत निर्णय झाला आहे. सोमवारच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब होणार आहे. याबरोबरच लोणी काळभोर पोलीस ठाणे येत्या २६ जानेवारीपासून शहर पोलीस दलास जोडण्यात येणार आहे. तर लोणी काळभोर पोलीस टाण्याचे विभाजन होऊन, नव्याने स्वतंत्र उरुळी कांचन पोलीस ठाणे निर्माण करण्यात येणार आहे.
कोट
लोणी काळभोर व लोणी कंद या दोन्ही पोलीस ठाण्यातील पोलिसांवर कामाचा ताण वाढल्याने वरील दोन्ही पोलीस ठाण्याचे विभाजन व्हावे यासाठी वर्षभरापासून पाठपुरावा चालू होता. उरुळी कांचन व वाघोली ही दोन स्वतंत्र पोलीस ठाणे अस्तित्वात येणार असल्याने, यापुढील काळात नागरिकांना पोलिसांची सेवा चांगली मिळणार आहे. - अशोक पवार, आमदार