'उरुळी कांचन ' च्या महिला सरपंचाविरोधातील अविश्वास ठराव चर्चेला येण्यापूर्वीच रद्दबातल!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2020 05:53 PM2020-07-18T17:53:34+5:302020-07-18T17:57:43+5:30
अनेकांची मंदीतील संधी मात्र हुकली !
उरुळीकांचन : उरुळी कांचनच्यासरपंच राजश्री वनारसे यांच्या विरोधातील अविश्वास ठरावावर सोमवारी (ता. २०) होणारी बैठक राज्य शासनाच्या ५ मार्च २०२० च्या शासन सुधारणा पत्रातील आदेशानुसार रद्द झाल्याने सरपंच राजश्री वनारसे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
उरुळी कांचनच्या सरपंच राजश्री वनारसे यांच्या विरोधात सोळापैकी आठ सदस्यांनी मागील सोमवारी अविश्वास ठराव दाखल केला होता. हवेलीचे तहसिलदार सुनिल कोळी यांनी अविश्वास ठरावावर चर्चेसाठी सरपंच राजश्री वनारसे यांच्यासह सोळा सदस्यांना सोमवारी (ता. २०) सकाळी अकरा वाजता ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित राहण्याबातच्या नोटीसा पाठवल्या होत्या. मात्र, जिल्हाधिकारी कार्यालयाने अचानक आज (शनिवारी) सकाळी अविश्वास ठरावावर चर्चा करण्यास मनाई केल्याने, राजश्री वनारसे यांच्याविरोधातील सदस्यांची ‘मंदीतील संधी’ हुकली आहे.
दरम्यान, राज्य शासनाच्या ५ मार्च २०२० च्या शासन सुधारणा पत्रातील आदेशानुसार विद्यमान ग्रामपंचायतीची मुदत संपायला सहा महिण्यापेक्षा कमी कालावधी उरला असेल तर ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यावर अविश्वास ठराव दाखल करता येत नाही ही बाब सरपंच राजश्री वनारसे यांनी तहसिलदार व जिल्हाधिकारी यांची प्रत्यक्ष भेटून निदर्शनास आणून दिली होती. याच नियमांचा आधार घेऊन गरज भासल्यास ठरावावर चर्चा करण्यासाठी बोलावलेल्या बैठकीच्या नोटीस काढण्याच्या प्रक्रियेला उच्च न्यायालयात आव्हान देण्याबाबत केलेल्या तयारीला हे यश आले. तसेच मला न्याय मिळाला, मात्र यात नेमका हलगर्जीपणा की राजकीय षडयंत्र असा सवाल राजश्री वनारसे यांनी उपस्थित केला आहे
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सुचनेनुसार प्रक्रिया रद्द : सुनिल कोळी
उरुळी कांचनच्या सरपंचाविरोधात ठराव तहसिल कार्यालय प्रशासनाने दाखल करुन घेतला असला तरी, त्यावर नेमका काय निर्णय घ्यावा याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे लेखी विचारणा केली होती. जिल्हाधिकारी कार्यालयाने दिलेल्या आदेशानुसारच गुरुवारी सदस्यांना नोटीसा पाठवल्या होत्या, मात्र शनिवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयाने आपला पूर्वींचा आदेश फिरवल्याने राजश्री वनारसे यांच्यावरील अविश्वास ठरावाची प्रक्रिया रद्द केलेली आहे. सुनिल कोळी,तहसिलदार, हवेली.