उरवडे आगीचे प्रकरण; कंपनीच्या मालकाचा जामीन फेटाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:08 AM2021-07-04T04:08:21+5:302021-07-04T04:08:21+5:30
पुणे : उरवडे (ता. मुळशी) येथील एका रासायनिक कंपनीला लागलेल्या आगीत १७ कामगारांचा होरपळून मृत्यू झाला होता. या ...
पुणे : उरवडे (ता. मुळशी) येथील एका रासायनिक कंपनीला लागलेल्या आगीत १७ कामगारांचा होरपळून मृत्यू झाला होता. या प्रकरणी कंपनी मालकाचा जामीन अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. बी. साळुंके यांनी फेटाळला.
ज्या मशिनमुळे आग भडकली ती मशिन प्रचंड प्रमाणात तप्त होत असल्याची तक्रार वर्षभरापासून कामगार करत होते. हे तपासात निष्पन्न झाले आहे. कामगारांच्या कोणत्याही सुरक्षेचा विचार न करता केमिकल पावडर प्रोडक्शन आणि पॅकिंग रूममध्ये मशिन आणली गेली, त्यामुळे आग पसरली. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. अद्याप दोषारोपपत्र दाखल झालेले नाही. गुन्हा दाखल असलेल्या काहींचा शोध घ्यायचा आहे. या सर्व बाबींचा विचार करून जामीन फेटाळण्याची मागणी अतिरिक्त सरकारी वकील विलास घोगरे पाटील यांनी केली होती. ती न्यायालयाने मान्य केली.
निकुंज बिपीन शहा (वय ३९, रा. सहकारनगर) असे जामीन फेटाळलेल्याचे नाव आहे. त्याचा दुबईतील भाऊ केयूर आणि वडील बिपीन जयंतीलाल शहा (वय ६८, रा. सहकारनगर) या दोघांवर पौड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे. त्यापैकी बिपीन यांना अटकपूर्व जामीन मिळाला आहे. याप्रकरणी पौड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ यांनी फिर्याद दिली आहे. ८ जून रोजी एस. व्ही. अकवा कंपनीला आग लागून ही घटना घडली. या प्रकरणात बचाव पक्षातर्फे न्यायालयीन कोठडीत असलेल्या निकुंज याचा जामिनासाठी अर्ज करण्यात आला होता.