उरवडे आग प्रकरण; कंपनीच्या मालकाला न्यायालयीन कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:15 AM2021-06-16T04:15:32+5:302021-06-16T04:15:32+5:30
पुणे : मुळशी तालुक्यातील उरवडे येथील एका रासायनिक कंपनीला लागलेल्या आगीत १७ कामगारांचा होरपळून मृत्यू झाल्याप्रकरणी कंपनीच्या मालकाला ...
पुणे : मुळशी तालुक्यातील उरवडे येथील एका रासायनिक कंपनीला लागलेल्या आगीत १७ कामगारांचा होरपळून मृत्यू झाल्याप्रकरणी कंपनीच्या मालकाला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
निकुंज शहा (वय ३९, रा. सहकारनगर) असे मालकाचे नाव आहे. त्याचा दुबईत असलेला भाऊ केयूर आणि वडील बिपिन जयंतीलाल शहा (वय ६८ रा .सहकारनगर) या दोघांवर गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी पौड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ यांनी फिर्याद दिली आहे. पौड पोलिसांनी मालकाला अटक केली आहे. ७ जूनला एसव्हीएस ॲक्वा कंपनीला आग लागून त्यात १७ कामगारांचा होळपळून मृत्यू झाला आणि ५ कामगार गंभीर जखमी झाले. पोलीस कोठडीची मुदत संपल्याने पोलिसांनी निकुंज याला न्यायालयात हजर केले. त्यावेळी सरकारी पक्षातर्फे पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी करण्यात आली. यास बचाव पक्षातर्फे ॲड. हर्षद निंबाळकर आणि ॲड. शिवम निंबाळकर यांनी विरोध केला. तपास अधिकाऱ्याला तपास करण्यास पुरेसा वेळ मिळाला आहे. पोलीस कोठडीस दाखविण्यात आलेली जुनीच कारणे असल्याचा युक्तिवाद बचाव पक्षातर्फे करण्यात आला.