अमेरिकी ‘कोव्होव्हॅक्स’ लस सप्टेंबरमध्ये मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:09 AM2021-06-26T04:09:53+5:302021-06-26T04:09:53+5:30
पुणे : नोव्हाव्हॅक्स या अमेरिकेतील कंपनीच्या ‘कोव्होव्हॅक्स’ लसीचे उत्पादन या आठवड्यात पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया येथे सुरू होणार ...
पुणे : नोव्हाव्हॅक्स या अमेरिकेतील कंपनीच्या ‘कोव्होव्हॅक्स’ लसीचे उत्पादन या आठवड्यात पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया येथे सुरू होणार आहे. ‘सिरम’चे सीईओ अदर पूनावाला यांनी शुक्रवारी ट्विट करून ही माहिती दिली. लसीच्या मानवी चाचण्या सुरू असून १८ वर्षांखालील वयोगटाला या लसीमुळे कोरोनापासून संरक्षण मिळू शकणार आहे.
परवानगी मिळाल्यावर तत्काळ वितरण सुरू करण्याच्या दृष्टीने सिरमने तयारी केली आहे. ‘गावी’अंतर्गत येणाऱ्या ‘कोव्हॅक्स’ देशांना पुरवाव्या लागणाऱ्या २० कोटी डोसचे अद्याप नियोजन सुरू असल्याचे समजते. सप्टेंबर महिन्यात ही लस बाजारात उपलब्ध होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
लसीची परिणामकारकता प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे. या लसीच्या चाचण्या सुरू झाल्या आहेत. जून २०२१ पर्यंत ‘कोव्होव्हॅक्स’च्या प्रत्यक्ष वापराला सुरुवात होईल, असे अदर पूनावाला यांनी तीन महिन्यांपूर्वी स्पष्ट केले होते. या लसीच्या प्रौढांवरील चाचण्या सध्या सुरू आहेत.
नोव्हाव्हॅक्स या अमेरिकी कंपनीच्या कोरोना प्रतिबंधक लसीबाबतचे संशोधन व उत्पादन करण्याबाबत त्या कंपनीने सिरम इन्स्टिट्यूटशी ऑगस्ट २०२० मध्ये करार केला. उच्च मध्यम किंवा उच्च उत्पन्न असलेले देश वगळता अन्य देशांसाठी कोरोना साथीच्या काळात नोव्हाव्हॅक्स लसीचे उत्पादन करण्याचा हक्क सिरमला या कराराद्वारे मिळाला. सर्व परवानग्या मिळून चाचण्या सुरळीत पार पडल्यास कोव्होव्हॅक्स ही आपत्कालीन वापरासाठी परवानगी मिळणारी देशातील आणखी एक महत्त्वाची लस असेल.
चौकट
परिणामकारकता ८९.३ टक्के
ब्रिटनमध्ये पार पडलेल्या मानवी चाचण्यांमध्ये कोव्होव्हॅक्स लसींची परिणामकारकता ८९.३ टक्के असल्याचे सिद्ध झाले. यात १८ ते ८४ या वयोगटातील १५ हजार स्वयंसेवकांवर लसीची चाचणी घेण्यात आली. कोरोनाच्या नवीन स्ट्रेनवरही ही लस प्रभावी असल्याचे विविध संशोधनातून सिद्ध झाले आहे. अमेरिकेतही लसींचे निष्कर्ष जाहीर करण्यात आले आहेत. यात परिणामकारकता ९० टक्के असल्याचे सिद्ध झाले.