पुरस्कारापेक्षा आम्हाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:10 AM2021-04-01T04:10:13+5:302021-04-01T04:10:13+5:30
शिक्षण उपसंचालक राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते लता करे यांचा सत्कार बारामती: तीन मुली व एका मुलासह आम्ही विदर्भातून बारामतीला ...
शिक्षण उपसंचालक राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते लता करे यांचा सत्कार
बारामती: तीन मुली व एका मुलासह आम्ही विदर्भातून बारामतीला आलो, तिन्ही मुलींची लग्ने झालीत, मुलगा दहावी झाला असून, पाटसला खासगी कंपनीत तुटपुंज्या पगारावर चौकीदार म्हणून काम करतो.आम्ही इथे एका खोलीत भाड्याने राहतो.अनेकजण कार्यक्रमास बोलावतात, अनेक सत्कार-पुरस्कार मिळाले. राष्ट्रीय पुरस्काराचा आनंद आहेच, त्याहीपेक्षा आम्हाला आर्थिक स्थैर्याची व आधाराची गरज आहे, अशी भावना लता करे यांनी व्यक्त केली.
६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांत विशेष पुरस्कार जाहीर झालेल्या लता भगवान करे, एक संघर्षकथा' या चित्रपटाच्या नायिका लता करे, दिग्दर्शक नवीन देशबोईना, गीतकार-संगीतकार प्रशांत महामुनी, गायिका गिरिजा महामुनी यांचा राज्याच्या प्रौढ व अल्पसंख्यांक शिक्षण संचालनालयाचे उपसंचालक राजेश क्षीरसागर यांचे हस्ते बारामतीत रविवारी (दि. २८) गौरव करण्यात आला. यावेळी त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. दाक्षिणात्य निर्माते ए. कृष्णा अरुबोधू यांची ही निर्मिती असून नवीन देशबोईना यांनी दिग्दर्शन केले आहे. कार्यकारी निर्माता अतुल साबळे, निर्मिती व्यवस्थापक प्रवीण बर्गे असून प्रतीक कचरे यांनी स्थिरचित्रण केले आहे. हृदयविकारग्रस्त पतीच्या उपचारासाठी अनवाणी पायाने मॅरेथॉन स्पर्धा धावणाऱ्या व जिद्दीने जिंकणाऱ्या ६५ वर्षीय अत्यंत गरीब महिलेची ही सत्यकथा आहे.लता करे यांच्यासह त्यांचे जीवनचरित्र गीतातून शब्दबद्ध करणारे अकलूज येथील अंध गीतकार- प्रशांत महामुनी, तितक्याच ताकदीने सुरेल आवाजात हे स्फूर्तीगीत गाणारी गायिका गिरीजा महामुनी, दिग्दर्शक नवीन देशबोईना, सुनेची भूमिका करणारी कलाकार राधा चव्हाण,प्रतीक कचरे या सर्वांचा बारामती जवळील जळोचीतील माळी मळा येथे करे यांच्या घरी या सर्वांचा सत्कार करण्यात आला. यावेळी लता करे यांचे पती भगवान करे, ज्योती क्षीरसागर, रुचिता क्षीरसागर, विश्वनाथ माने, विठ्ठल साळवे, बाळासाहेब वाघमारे यांची उपस्थिती होती. प्रशांत महामुनी यांनी या चित्रपटासाठी ‘नेईल तुला शिखरावरती तुझीही पाऊल वाट....आणि जायचे क्षितिजा पल्याड तुजला’ ही दोन स्फूर्तिदायक गीते लिहिली असून दोन्ही गीते त्यांची कन्या गिरीजा हिने गायली आहेत. लवकरच राष्ट्रपतींच्या हस्ते हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे.
लता करे यांनी स्वत:सह मराठी चित्रपटाचा नावलौकिक वाढविला आहे, त्यांच्या चित्रपटाची थेट राष्ट्रीय स्तरावर दखल घेतल्याने हिंदीतही या चित्रपटाचे डबिंग होणार आहे. संगीतकार-गीतकार प्रशांत महामुनी व गायिका गिरीजा महामुनी यांचेही चित्रपटात महत्वाचे योगदान आहे.
- राजेश क्षीरसागर
शिक्षण उपसंचालक
हा चित्रपट आंतरराष्ट्रीय स्तरावरही पोहोचला आहे.स्वत:च्या जीवनावर चित्रीत झालेल्या,त्यात स्वत: नायिका म्हणून काम केलेल्या लता करे या एकमेव व्यक्ती आहेत.राष्ट्रीय पुरस्कार घोषित झाल्याने अडीच-तीन वर्षे केलेल्या परिश्रमाचे चीज झाले आहे.
- नवीन देशबोईना
चित्रपट दिग्दर्शक
बारामती येथे लता करे यांचा गौरव करताना उपसंचालक राजेश क्षीरसागर, भगवान करे, दिग्दर्शक देशबोईना व इतर.
३१०३२०२१-बारामती-०१