एका स्वच्छतागृहाचा ४९ जणांकडून होतोय वापर

By admin | Published: June 29, 2015 06:50 AM2015-06-29T06:50:23+5:302015-06-29T06:50:23+5:30

सार्वजनिक स्वच्छतागृहातील एका स्वच्छतागृहांचा वापर ४९ जणांकडून केला जात असल्याची धक्कादायक माहिती एका सर्व्हेक्षणामध्ये उजेडात आली आहे.

The use of a cleanliness house by 49 people | एका स्वच्छतागृहाचा ४९ जणांकडून होतोय वापर

एका स्वच्छतागृहाचा ४९ जणांकडून होतोय वापर

Next

दीपक जाधव, पुणे
शहरामध्ये झोपडपट्ट्यांमधील १ लाख ७ हजार घरांमध्ये स्वच्छतागृहे उपलब्ध नसून ते सार्वजनिक शौचालयांवर अवलंबून आहेत, या पार्श्वभूमीवर सार्वजनिक स्वच्छतागृहातील एका स्वच्छतागृहांचा वापर ४९ जणांकडून केला जात असल्याची धक्कादायक माहिती एका सर्व्हेक्षणामध्ये उजेडात आली आहे. ही संख्या अत्यंत अमानुष असल्याने त्याकरिता ‘एक घर, एक संडास’ ही संकल्पना डोळ्यासमोर ठेऊन २०१७ पर्यंत प्रत्येक घरात स्वच्छतागृह उभारण्याचा उद्दिष्ट पुणे महापालिकेने ठेवले आहे.
दिल्लीमध्ये स्मार्ट सिटी योजनेच्या शुभारंभप्रसंगी पुणे शहरात राबविण्यात येत असलेल्या ‘सॅनिटेशन प्रोग्राम व कम्युनिटी टॉयलेट’ या उपक्रमाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले. पुणे महापालिका व शेल्टर, समग्र, श्वास या स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून हा उपक्रम राबविला जात आहे.
महापालिकेच्या उपक्रमात सहभागी झालेल्या शेल्टर या स्वयंसेवी संस्थेने काही दिवसांपूर्वी शहरातील स्वच्छतागृहाच्या परिस्थितीचा सर्व्हे केला. शहराच्या एकूण लोकसंख्येपैकी ४० टक्के रहिवाशी झोपडपट्टीमध्ये राहत आहेत. शहरातील १ लाख ७ हजार घरांमध्ये स्वच्छतागृह नसल्याचे आढळून आले होते. या घरातील सर्व कुटुंबीय हे सार्वजनिक स्वच्छतागृहाचा वापर करतात. स्वच्छतागृहातील एका स्वच्छतागृहाचा ४९ जणांकडून वापर केला जात असल्याचे या सर्व्हेत आढळून आले होते. त्यामुळे स्वच्छतागृहांची प्रचंड दुर्दशा झालेली दिसून येते. मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरलेली असते.
अनेकजण या दुर्गंधीला कंटाळून उघड्यावरच मलमूत्र विसर्जन करतात. त्यातून आरोग्याशी संबंधित अनेक अडचणींना त्यांना तोंड द्यावे लागत आहे.
यावर मात करण्यासाठी पुणे महापालिकेने पुढाकार घेतला आहे. स्वंयसेवी संस्थेच्या माध्यमातून येत्या दोन वर्षांत शहरातील प्रत्येक घरात स्वच्छतागृह उभारण्याचे उद्दिष्ट पालिकेने ठेवण्यात आल्याची माहिती आयुक्त कुणाल कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिली आहे. महानगरांमध्ये स्वच्छतागृह उभारणी करण्यासाठी पुढाकार घेणारी पुणे ही पहिली महापालिका आहे.
झोपडपट्ट्यांमधील ६० हजार घरांमध्ये स्वच्छतागृहे उभारता येणे शक्य आहे, त्याकरिता १२१ कोटी रुपयांचा निधी लागणार आहे. पालिकेने चालू वर्षात या
योजनेकरिता २ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केलेली आहे. प्रायोगिक तत्त्वावर यमुनानगर येथे या योजनेची अंमलबजावणी शेल्टर संस्थेच्या माध्यमातून सुरू आहे. शहरात १५ हजार वैयक्तिक शौचालये बांधून झाली आहेत.

स्वयंसेवी संस्थांची मदत
झोपडपट्ट्यांमधील घरांमध्ये वैयक्तिक शौचालय उभारण्यासाठी महापालिका व स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने संयुक्तपणे प्रयत्न केले जात आहेत. एका घरामध्ये शौचालय उभारण्यासाठी पालिकेकडून स्वयंसेवी संस्थेला १५ हजार रुपयांचे साहित्य पुरविण्यात येते. उर्वरित खर्च झोपडपट्टीधारकास उचलावा लागतो. या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असून येत्या दोन वर्षांत ‘प्रत्येक घरात शौचालय’ हे उद्दिष्ट साध्य करण्यास महापालिकेला निश्चितच यश येईल.’’
- संजय गावडे, सहायक आयुक्त, घनकचरा विभाग

Web Title: The use of a cleanliness house by 49 people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.