पिण्याच्या पाण्याचा वापर बांधकामासाठी
By admin | Published: April 21, 2016 01:16 AM2016-04-21T01:16:11+5:302016-04-21T01:16:11+5:30
आंबेगाव पठार परिसरात खासगी बांधकामे जास्त आहेत. महापालिका हद्दीत असल्याने प्रत्येकाला स्वतंत्र पिण्याच्या पाण्याचे नळ कनेक्शन दिले आहे
आंबेगाव बुद्रुक : आंबेगाव पठार परिसरात खासगी बांधकामे जास्त आहेत. महापालिका हद्दीत असल्याने प्रत्येकाला स्वतंत्र पिण्याच्या पाण्याचे नळ कनेक्शन दिले आहे. पुण्यात पाणी समस्या भेडसावू नये, यासाठी महापालिकेने पाण्याचा कामी वापर व्हावा यासाठी एक दिवसाआड पाणी सोडले जात आहे. याच्या गैरफायदा काही नागरिक घेत असून पिण्याच्या पाण्याचा वापर बांधकाम करण्यासाठी करतात. प्रशासन त्याच्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
इमारतीचे बांधकाम चालू असल्याने त्या परिसरात बांधकाम मालक पाणी उपसण्यासाठी इलेक्ट्रिक मोटर वापरून पाणी उपसत असल्याने आजूबाजूला कमी पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. नागरिकांना पाणी मिळत नसल्याचे तक्रारी करीत आहे.
महापालिका प्रशासनाला सांगूनसुद्धा या प्रश्नाकडे काणाडोळा करीत असल्याचे नागरिकांनी सांगितले. प्रशासनाच्या काही अधिकारी लोकांनी भेटी देऊनसुद्धा अशा पाणीउपसा करणाऱ्या लोंकावर कोणतीही कारवाई केली नसल्याने नागरिकांत संताप पसरला आहे.
बांधकामासाठी पाण्याचा वापर करू नये, असे नागरिकांचे म्हणणे महापालिका अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असल्याचे दिसत आहे. (वार्ताहर)