पुण्याचा पाणीवापर ७ वर्षांत ७.२१ टीएमसीने वाढला, लोकसंख्या वाढल्याने गरज

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2018 02:38 AM2018-12-26T02:38:01+5:302018-12-26T02:39:00+5:30

महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने निश्चित केलेले मापदंड ओलांडून पुणे महापालिकेतर्फे सलग सात वर्षांपासून अधिकचे पाणी वापरले जात आहे.

 The use of drinking water increased by 7.21 TMC in 7 years; | पुण्याचा पाणीवापर ७ वर्षांत ७.२१ टीएमसीने वाढला, लोकसंख्या वाढल्याने गरज

पुण्याचा पाणीवापर ७ वर्षांत ७.२१ टीएमसीने वाढला, लोकसंख्या वाढल्याने गरज

Next

पुणे : महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने निश्चित केलेले मापदंड ओलांडून पुणे महापालिकेतर्फे सलग सात वर्षांपासून अधिकचे पाणी वापरले जात आहे. त्यात दरवर्षी वाढ होत चालली असून, गेल्या सात वर्षांत पालिकेचा पाणीवापर तब्बल ७.२१ टीएमसीने वाढला आहे. पालिकेला ११.५० टीएमसी पाणी मंजूर असताना पालिकेकडून १८.७१ टीएमसीपर्यंत पाणीवापर केला जात आहे.

पुणे शहर व परिसरातील नागरीकरणामध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालेली आहे. त्यामुळे शहराची तहान भागवण्यासाठी आवश्यक असलेल्या पाण्याच्या मागणीतही वाढ झाली आहे. परंतु, पालिकेला प्राधिकरणाने मंजूर केलेल्या ११.५० टीएमसी पाण्याचा वापर पालिकेने केला पाहिजे. मात्र, २०११-१२ पासून २०१७-१८ पर्यंत एकदाही पालिकेने ११.५० टीएमसी पाण्याचा वापर केला नाही. पालिकेने १५.३९ टीएमसीपासून १८.७१ टीएमसीपर्यंत पाण्याचा वापर केल्याचे दिसून आले आहे. जलसंपदा विभागाने महापालिका विरोधातील दाव्यात प्राधिकरणाकडे याबाबतची अधिकृत माहिती दाखल केली आहे. त्यातही दरवर्षी पालिकेकडून वापरल्या जाणाऱ्या अधिकच्या पाण्यातही दरवर्षी वाढ झाल्याचे दिसून येते. २०११-१२ पासून वापरल्या जाणाºया पाण्याचा विचार करता त्यात आत्तापर्यंत २.८१ टीएमसीपर्यंत वाढ झाली आहे.
पुणे शहर, कॅन्टोंमेंट व शेजारील गावांची लोकसंख्या ४०.७६ लाख आहे. त्यानुसार प्राधिकरणाने प्रतिदिन माणशी १५५ लिटर मंजूर केले आहे. त्यानुसार ११.५० टीएमसी पाणी वापरणे बंधनकारक आहे. मात्र, २०१७-१८ मध्ये पालिकेचा आत्तापर्यंतचा सर्वाधिक पाणीवापर १८.७१ टीएमसीपर्यंत गेला आहे. तसेच नोव्हेंबर-डिसेंबर २०१७ आणि जानेवारी ते मार्च २०१८ या पाच महिन्यांतच पालिकेचा सरासरी १६०० एमएलडी असा पाणीवापर आहे. तसेच याच कालावधीमध्ये काही वेळा पालिकेने १७५० एमएलडीपर्यंत पाणी वापरले आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाने पालिकेला पाणीपुरवठा करणारे पंप पोलीस बंदोबस्तात बंद करण्यात आले. मात्र, तरीही पालिकेचा पाणीवापर कमी झालेला नाही. पालिकेकडून सध्या १३५० एमएलडी पाणी वापरले असून, यामुळे वार्षिक १७.४ टीएमसी पाण्याचा वापर होत आहे. त्यामुळे मोठ्या पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे.

पालिकेची लोकसंख्या अन् पाणीपुरवठा

पुणे शहराला 40,76,000 लोखसंख्येला पाणीपुरवठा करावा लागत आहे. त्यात लष्कर भागासह लगतच्या गावातील १ लाख ५८ हजार लोकसंख्येचा समावेश आहे.

जलसंपदा विभागाबरोबर झालेल्या करारानुसार पुणे शहरासाठी ५ टीएमसी पाणी मंजूर आहे. मात्र, पुणे महापालिकेने ६.५० टीएमसी सांडपाणी प्रक्रिया करून हडपसरजवळील कालव्यात सिंचनासाठी पाणी सोडले तरच पालिकेला ६.५० टीएमसी पाणी देणे अपेक्षित आहे. त्यामुळे पालिकेला ११.५० टीएमसी पाणी मिळते. परंतु, पालिकेकडून ११.५० टीएमसीपेक्षा अधिक पाणी वापरले जात आहे. त्यामुळे पालिकेने अधिकचे पाणी न वापरता प्राधिकरणाच्या मापदंडानुसार पाणी वापरणे आवश्यक आहे.
- सुरेश शिर्के, अध्यक्ष,
भारतीय जलसंपत्ती संस्था, पुणे केंद्र.

Web Title:  The use of drinking water increased by 7.21 TMC in 7 years;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी