स्वच्छतागृहांसाठी जेट यंत्राचा वापर
By Admin | Published: June 25, 2016 12:57 AM2016-06-25T00:57:38+5:302016-06-25T00:57:38+5:30
स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेसाठी यापुढे जेट यंत्राचा वापर करण्यात येणार आहे. जास्त कचरा साठणारी शहरातील २०० ठिकाणे निश्चित करण्यात आली असून,
पुणे : स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेसाठी यापुढे जेट यंत्राचा वापर करण्यात येणार आहे. जास्त कचरा साठणारी शहरातील २०० ठिकाणे निश्चित करण्यात आली असून, तेथील कचरा नियमितपणे उचलला जावा यासाठी कचरा वाहून नेणाऱ्या वाहनांचे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. त्याचे काटेकोर पालन केले जाईल, असे पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने बैठकीत सांगण्यात आले.
महापौर प्रशांत जगताप व खासदार वंदना चव्हाण यांनी पालिकेच्या घनकचरा विभागाला शहरातील कचऱ्याच्या संदर्भात बैठक घेण्यास सांगितले होते. त्यानुसार झालेल्या बैठकीत शहरातील कचरा समस्येचा आढावा घेण्यात आला. महापौर जगताप, खासदार वंदना चव्हाण, पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख सुरेश जगताप, क्षेत्रीय अधिकारी माधव जगताप तसेच अन्य अधिकारी बैठकीला उपस्थित होते.
खासदार चव्हाण यांनी या वेळी अनेक सूचना केल्या. त्या म्हणाल्या, ‘‘कचरा कुंडीत टाकणार नाहीत त्यांच्यावर पालिकेने दंडात्मक कारवाई करावी. सार्वजनिक ठिकाणी कचरा करू नये यासाठी पालिकेच्या वतीने प्रबोधन केले जात नाही. लोकजागृतीसाठी विशेष उपक्रम आयोजित केले जावेत. सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या दुरवस्थेकडेही पालिकेचे लक्ष नसते. यासाठी खासगी उद्योगांचे सहकार्य घ्यावे.’’
घनकचरा विभागाचे प्रमुख जगताप यांनी माहिती दिली. जास्त कचरा साठणाऱ्या २०० ठिकाणी जास्त लक्ष केंद्रित करणार असल्याचे त्यांनी सांगितले. सार्वजनिक स्वच्छतागृहे दत्तक घेण्यासाठी काही उद्योगांनी होकार दिला आहे. दरम्यान, पालिकेकडून क्षेत्रीय कार्यालयांना यासाठी जेट यंत्र उपलब्ध करून देणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.