खंडणी अन् लाच घेत भाजपकडून निवडणूक रोख्यांचा वापर; प्रशांत जगतापांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2024 01:52 PM2024-03-19T13:52:11+5:302024-03-19T13:52:35+5:30
जगताप म्हणाले, राजकीय देणगी देणाऱ्या अनेक कंपन्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांची कारवाई सुरू होती...
पुणे : कॉर्पोरेट कंपन्यांकडून खंडणी वसूल करण्यासाठी तसेच सरकारी कंत्राट देण्यासाठी राजकीय देणगीच्या स्वरूपात लाच घेण्यासाठी भाजपद्वारे निवडणूक रोख्यांचा वापर करण्यात आला आहे. याविषयी स्लाईड शोच्या माध्यमातून सादरीकरण करत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पार्टीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पत्रकार परिषदेत भाजपवर आरोप केले.
जगताप म्हणाले, राजकीय देणगी देणाऱ्या अनेक कंपन्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांची कारवाई सुरू होती. याचे उदाहरण असे की, राजकीय देणगी देणाऱ्या एका कंपनीला बिहारमधील एका पुलाचे कंत्राट देण्यात आले होते, त्या कंपनीने बांधलेला पूल काही दिवसांतच जमीनदोस्त झाला, यात मोठी मनुष्यहानी झाली. तरीही इलेक्टोरल बॉण्ड्स दिल्यामुळे या कंपनीवर कारवाई करण्यात आली नाही. कोणत्या कंपनीवर कधी कारवाई झाली आणि या कारवाईतून मुक्त होण्यासाठी या कंपन्यांनी कशी देणगी दिली याची माहिती यावेळी मांडण्यात आली.
जुगाराच्या माध्यमातून देशातील कित्येक कुटुंबे उद्ध्वस्त करणाऱ्या गेमिंग कंपनीकडून देणगी स्वीकारताना सरकारची साधनशुचिता कुठे गेली? कोरोनाच्या काळात गरीब रुग्णांना लुबाडण्याचा आरोप असलेल्या रुग्णालयांकडून देणगी स्वीकारताना नैतिकता कुठे गेली? असे प्रश्न यावेळी प्रशांत जगताप यांनी उपस्थित केले.
भारतीय जनता पार्टीने निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून अमाप माया जमवली आहे. याच पैशाच्या जोरावर इतर पक्षांमध्ये फूट पाडून, त्यांचे आमदार, खासदार विकत घेऊन लोकशाहीला एकप्रकारे पैशाच्या जोरावर जमीनदोस्त करण्याचा भारतीय जनता पार्टीचा प्रयत्न आहे.
- प्रशांत जगताप