पाण्याची गळती शोधण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर
By निलेश राऊत | Published: May 5, 2023 05:34 PM2023-05-05T17:34:59+5:302023-05-05T17:35:11+5:30
महापालिका गॅस व साऊंड सेन्सरच्या मदतीने घेणार गळती भागाचा वेध
पुणे: शहरातील जुन्या जलवाहिन्यांमधून होणारी पाण्याची गळती शोधण्यासाठी महापालिका आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणार असून, याकरिता प्रति किलोमिटरसाठी महापालिका तब्बल एक लाख रूपये खर्च करणार आहे. जल वाहिनीतील गळती शोधण्यासाठी हेलियम वायू (गॅस) आणि साऊंड सेन्सरचा वापर करण्यात येणार आहे.
समान पाणी पुरवठा योजनेतंर्गत शहरात होणारी पाण्याची ३५ ते ४० टक्के गळती १० ते १५ टक्क्यांवर आणण्याचे उद्दिष्ठ ठेवण्यात आले आहे. त्या अनुषंगाने पाणी पुरवठा करणाऱ्या जुन्या जल वाहिन्यांमधील गळती प्राधान्याने शोधण्यात येणार आहे. पाण्याची गळती शोधण्यासाठी महापालिकेने प्रायोगित तत्वावर अधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला हाेता. या तंत्रज्ञानाच्या मदतीने वडगाव जल केंद्रापासून कात्रज येथील केदारेश्वर पाण्याच्या टाकीपर्यंतच्या मुख्य जलवाहिनीत १३ ठिकाणी गळती होत असल्याचे निदर्शनास आले हाेते. त्यानुसार गळती राेखण्याचे काम महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने केले.
आता गॅस व साऊंड सेन्सरचा वापर पाणी गळती शोधण्यासाठी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जल वाहिनीमध्ये हेलियम वायू व साऊंड सोडून त्याच्या सेन्सरच्या माध्यमातून गळती शोधली जाणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली.
३४ झाेनमध्ये समान पाणी पुरवठ्याचे काम पुर्ण
शहराला समान पाणी पुरवठा करण्यासाठी महापालिकेने समान पाणी पुरवठा योजना हाती घेतली असून, या योजनेचे काम १३२ झोन मध्ये करण्यात येणार आहे. यापैकी ३४ झोनचे काम पूर्ण झाले असून, केवळ ८ हजार पाण्याचे मिटर बसविण्याचे काम बाकी आहे. तर दहा झोनचे काम व तेथील देखभाल दुरूस्तीची कामे खाजगी ठेकेदार कंपनीने सोपविण्यात आली आहे. या दहा झोनमध्ये पाणी पुरवठ्यासाठी आता व्हॅाल्व्ह खुले बंद करण्याचे काम ॲटो कंट्रोलव्दारे करण्यात येणार आहे.