विजयस्तंभाला भेट देण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा : जिल्हाधिकारी नवल किशोर राम
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2019 07:19 PM2019-12-14T19:19:39+5:302019-12-14T19:26:03+5:30
विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी दरवर्षीप्रमाणे येतात लाखो नागरिक
पुणे : पेरणे फाटा येथील विजय स्तंभाला १ जानेवारी रोजी भेट देणाऱ्या व्यक्तींनी येथे येण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले आहे. तसेच, या काळात अहमदनगर येथून येणारी वाहतूक वळविण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी दरवर्षीप्रमाणे लाखो नागरिक येतात. त्यांना पुरविण्यात येणाऱ्या सोयी-सुविधांची पाहणी जिल्हाधिकारी राम आणि पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी शनिवारी केली. तसेच, ग्रामस्थांसमवेत नियोजन कामांचा आढावा घेतला. प्रशासनाच्या सर्व विभागांचे प्रमुख अधिकारी यावेळी उपस्थित होते.
‘अभिवादन कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाच्यावतीने आवश्यक ती सर्व तयारी करण्यात येत आहे. स्थानिक नागरिक, प्रशासन यांच्यामध्ये सकारात्मक भूमिका आहे. सर्व संबंधितांच्या गाठीभेटी घेण्यात आल्या आहेत. आरोग्य, स्वच्छता, पिण्याचे पाणी, वैद्यकीय सेवा यांचे नियोजन उत्तम पद्धतीने करण्यात येत आहे. गतवर्षी विजयस्तंभ कार्यक्रमास नागरिकांनी सहकार्य केल्यामुळे कार्यक्रम सुरळीत पार पडला. यावर्षी देखील त्याच धर्तीवर नियोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी समाज माध्यमांवर समाजविघातक संदेश आल्यास त्याकडे दुर्लक्ष करावे. कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी राम यांनी केले.
पोलिस अधीक्षक पाटील म्हणाले, समाज माध्यमांवर पोलीस यंत्रणा विशेष लक्ष ठेवणार आहे. सर्वांच्या सहकार्याने अभिवादन कार्यक्रम शांततेत पार पडेल.
-------------
वाहतूक समस्यांचा घेतला आढावा
वाघोली येथील सातत्याने होणाऱ्या वाहतूक कोंडीवर मार्ग काढण्याची सूचना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केली. तसेच, पुणे-अहमदनगर मार्गावरील कामांची पाहणीही त्यांनी केली. रखडलेली कामा मुदतीत पूर्ण करण्याची सूचना त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पीएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना केली. पोलीस अधीक्षक संदीप पाटील, आमदार अशोक पवार, सरपंच वसुंधरा उबाळे, पीएमआरडीएचे नगररचनाकार विवेक खरवडकर या वेळी उपस्थित होते. ग्रामस्थांनीही बायपास, कचरा आणि वाहतुकीच्या संदर्भात भेडसावणाऱ्या समस्यांची माहिती दिली.
--------