बांधकाम व्यावसायिकाला धमकाविण्यासाठी रिव्हॉल्व्हरचा वापर; दीप्ती काळेच्या साथीदाराला पोलीस कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2021 08:55 PM2021-04-28T20:55:19+5:302021-04-28T20:56:38+5:30
बांधकाम व्यावसायिकाशी जवळीक साधून त्याला व्यवसायासाठी ३५ लाख रुपये या टोळीने दिले होते.
पुणे : व्यावसायिकाकडून ३ कोटी रुपयांची जमीन नावावर करुन घेतल्यानंतर आणखी ५८ गुंठे जमीन बळकाविण्यासाठी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देणे. हाताने मारहाण करणे आणि रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून धमकाविल्याच्या प्रकरणात अॅड. दीप्ती काळेच्या साथीदाराला फरासखाना पोलिसांनीअटक केली.
न्यायालयाने त्याला ३० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे.
नितीन मनोहर हनमे (वय ३१, रा. संतोषनगर, कात्रज) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी दीप्ती काळे, निलेश शेलार आणि आणखी दोघांविरुद्ध फरासखाना पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यातील मुख्य आरोपी अॅड. दीप्ती काळे हिचे मंगळवारी दुपारी ससून रुग्णालयातील ८ व्या मजल्यावरील खिडकीतून पळून जाताना खाली पडून मृत्यु झाला.
बांधकाम व्यावसायिकाशी जवळीक साधून त्याला व्यवसायासाठी ३५ लाख रुपये या टोळीने दिले होते. त्याबदल्यात मरकळ येथील ४२ गुंठे जमीन दीप्ती काळे हिच्या नावावर करुन घेतली होती. उरलेली ५८ गुंठे जमीन नावावर करुन देण्यासाठी या बांधकाम व्यावसायिकाला धमकी दिली जात होती. याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी नितीन हनमे याला अटक करुन बुधवारी न्यायालयात हजर केले होते. सरकारी वकील किरण बेंडभर यांनी सांगितले की, हा गुन्हा गंभीर स्वरुपाचा आहे. फरार असलेल्या इतर दोन आरोपींचा शोध घ्यायचा आहे. या गुन्ह्यात आरोपींनी रिव्हॉल्व्हरचा वापर केल्याचे निष्पन्न झाले आहे. ते जप्त करायचे आहे. गुन्हा करण्यासाठी हनमे याला किती रक्कम मिळाली आह. या जमीन व्यवहार कशाप्रकारे झाला, याचा तपास करण्यासाठी ७ दिवसांची पोलीस कोठडी द्यावी, अशी अॅड. बेंडभर यांनी मागणी केली. न्यायालयाने ३० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली.