‘माहिती अधिकार कायदा वापरा अन्यायाविरुद्ध’
By admin | Published: March 30, 2015 05:32 AM2015-03-30T05:32:03+5:302015-03-30T05:32:03+5:30
तुमच्यावर अन्याय होत असेल, तर माहिती अधिकार कायद्याचा वापर करा व अन्याय दूर करा, असे आवाहन माहिती अधिकार कार्यकर्ते रामदास जंगम यांनी केले.
पिंपरी : तुमच्यावर अन्याय होत असेल, तर माहिती अधिकार कायद्याचा वापर करा व अन्याय दूर करा, असे आवाहन माहिती अधिकार कार्यकर्ते रामदास जंगम यांनी केले.
कायद्याचा वापर लहानापासून वृद्धांपर्यंत करता येतो. एखादा अशिक्षित, अपंग, अंध असेल तर माहिती अधिकाऱ्याकडूनच अर्ज लिहून घेता येतो. महाराष्ट्र राज्य देशात प्रथम क्रमांकावर या कायद्याचा वापर करीत आहे. इंग्रजांनी १९२३ मध्ये सरकारी कामाबाबत गुप्ततेचा कायदा केला होता. त्यामुळे लोकांवर अन्याय होत होता. त्यासाठी अनेक वर्षे झगडून हा कायदा अमलात आणला. माहिती अधिकार कायद्याचा वापर सरकारी, निमसरकारी कार्यालये, तसेच ज्या संस्थांना सरकारकडून अनुदान मिळते, अशा ठिकाणी करता येतो. जर आपणावर अन्याय होत असेल, तर या कायद्याचा वापर करून अन्यायाचे निवारण करून घ्यावे, असे प्रतिपादन जंगम यांनी चिंचवड ज्येष्ठ नागरिक संघातर्फे आयोजित सभासद वाढदिवस सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते.
नितीन यादव यांनी माहिती अधिकार कायदा २००५ बाबत ज्येष्ठांना माहिती दिली. प्रमुख पाहुणे उद्योजक महादेव शेंडगे होते.
प्रभारी अध्यक्षा उषा गर्भे यांनी पाहुण्यांचे स्वागत करून मनोगत व्यक्त केले. रमेश डोंगरे, चंद्रकांत कोष्टी, चंद्रकांत पारखी, रमेश इनामदार, तुकाराम सपकाळ, नारायण दिवेकर, नारायण राहिंज, अविनाश भिडे, सूर्यकांत पारखी यांनी आयोजन केले. गोपाळ भसे यांनी सूत्रसंचालन केले. नंदकुमार मुरडे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)