सोशल मीडियाचा वापर नवतंत्रज्ञानासाठी करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 04:38 AM2017-09-25T04:38:57+5:302017-09-25T04:39:07+5:30
‘सोशल मीडियाचे जेवढे फायदे आहेत तेवढेच तोटेसुद्धा, सोशल मीडियाचा वापर हा विद्यार्थ्यांनी मनोरंजनासाठी न करता तो नवनवीन तंत्रज्ञानासाठी केला तर त्याचा सर्वांसाठी फायदा होईल
बारामती : ‘सोशल मीडियाचे जेवढे फायदे आहेत तेवढेच तोटेसुद्धा, सोशल मीडियाचा वापर हा विद्यार्थ्यांनी मनोरंजनासाठी न करता तो नवनवीन तंत्रज्ञानासाठी केला तर त्याचा सर्वांसाठी फायदा होईल,’ असे मत शिवनगर विद्या प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष रंजन तावरे यांनी व्यक्त केले.
अभियंता दिनानिमित्त शिवनगर विद्या प्रसारक मंडळ अभियांत्रिकी शाखेतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. शिबिराचे उद्घाटन माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष व संस्थेचे उपाध्यक्ष रंजन तावरे व महाविद्यालयाचे विश्वस्त यांच्या हस्ते झाले . त्यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एम. यादव व सिव्हिल शाखेचे प्रमुख प्रो. एन. पी. पिंगळे व विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी जलसंपदा विभागाचे सहायक अभियंता आरती खंडेलवाल यांनी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर स्पर्धा परीक्षांविषयी विद्यार्थ्यांना प्रश्नोत्तरातून मार्गदर्शन केले. सिव्हिल शाखेतील शंभरपेक्षा अधिक विद्यार्थी-विद्यार्थिनींनी यावेळी रक्तदान केले.
यासाठी फलटण मेडिकल फाउंडेशनने शिबिरासाठी मोलाचे सहकार्य केले. शिबिर यशस्वी पार पाडण्यासाठी प्रा. एस. एस. महानवर, प्रा. व्ही. ए. चौगुले, अक्षय साळुंखे, रणजीत यादव, अमिर शेख, प्रवीण कर्णे, निखिल कुंभार व अक्षय सावंत यांनी मदत केली.