लॉकडाऊन काळात शेतमाल विक्रीसाठी समाज माध्यमाचा वापर करावा : राजू शेट्टी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2020 02:03 PM2020-04-06T14:03:53+5:302020-04-06T14:10:35+5:30
शेतकऱ्यांचा सर्व्हे करून त्यांना योग्य ती मदत शासनाच्या माध्यमातून मिळायला हवी..
बारामती : समाज माध्यमाचा वापर करून शेतकरी थेट ग्राहकाला शेतमाल विक्रीसाठी पुढे येत आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आम्ही इचलकरंजी, जयसिंगपूर, पुणे आदी शहरातील ग्राहकाला शेतमाल जागेवर पुरवत आहोत. सध्या घरात असलेल्या शहरी तरुणांनी देखील यामध्ये पुढाकार घेत आपल्या कॉलनी, सोसायटी किंवा परिसरातील नागरिकांची गरज ओळखून थेट शेतकऱ्यांकडून भाजीपाला, फळे खरेदी करावा. त्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. शहरी तरुण वर्गाने या परिस्थितीत शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढे यावे, असे आवाहन माजी खासदार व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी लोकमतशी बोलताना केले.
सध्या लॉकडाऊनमुळे शेतमाल विक्री करताना शेतकऱ्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर माजी खासदार राजू शेट्टी यांच्याशी लोकमतने संवाद साधला. यावेळी बोलताना माजी खासदार शेट्टी पुढे म्हणाले, व्यापारीवर्ग साखळी करून या परिस्थितीचा फायदा उचलणार त्यामध्ये नवीन काही नाही. मात्र शेतकऱ्याने देखील स्वत:चे नुकसान टाळण्यासाठी तंत्रज्ञानाचा फायदा करून घेतला पाहिजे. आज शेतकऱ्यांच्या तरुणपिढीच्या हाती अँड्रॉइड मोबाईल आहेत. समाज माध्यमातून शहरी आणि ग्रामीण तरुण जोडले गेले आहेत. त्यामुळे शेतकरी तरुणांनी आपल्या जवळ असणाऱ्या शेतमालाची माहिती शेअर करावी. तसेच शहरी तरुणांनी देखील आपल्या कॉलनीला परिसरातील रहिवाश्याना हवा असणारा भाजीपाला, फळे खरेदी करावीत. थेट विक्रेता आणि ग्राहक असा संबंध आल्यामुळे दोघांनाही हा व्यवहार परवडणार आहे. इतरवेळी यामध्ये सक्रिय असणाऱ्या व्यापारी व दलालांमुळे नफेखोरी वाढते. त्यामुळे शेतकऱ्यांकडून कमी किमतीत शेतमाल खरेदी करून ग्राहकांना शेतमाल विकताना त्याची किंमत मोठ्याप्रमाणात वाढते. नफेखोरी टाळण्यासाठी या मार्गाचा अवलंब शेतकरी वर्गाने करावा. ज्याप्रमाणे काही शेतकरी सामूहिक शेती करतात त्याच पद्धतीने सामूहिक विक्रीपद्धत समाज माध्यमातून शेतकरी राबवू शकतात. शेतकरी प्रत्येक घरी जाऊन शेतमाल विकू शकत नाही. त्यासाठी शहरामध्ये विविधभागात असणाऱ्या तरुण मंडळानी आपल्याला कॉलनीला, सोसायटीला किती दिवसाला किती भाजीपाला लागतो. त्याची यादी केली व शेतकऱ्यांनी आपला शेतमाल सामूहिक पद्धतीने तेथे पाठवला तर ग्राहकांना देखील ताजा स्वच्छ भाजीपाला मिळण्यास मदत होणार आहे. आम्ही असे प्रयोग मागील पंधरा दिवसांपासून सुरू केले आहेत. इचलकरंजी, जयसिंगपूर ते पुणे येथील तरुण मंडळाशी सातत्याने संपर्क ठेवून ताजा स्वच्छ शेतमाल पाठवला जात आहे. त्याचा थेट फायदा शेतकऱ्यांना होत आहे. आता ग्राहकांच्या मागणीनुसार कोकणातील आंबा देखील आम्ही मागवला आहे, असे माजी खासदार राजू शेट्टी यावेळी म्हणाले.
शेतकऱ्यांना शासनाने मदत करावी...
लॉकडाऊनच्या परिस्थितीमुळे द्राक्ष, केळी, भाजीपाला आणि फुल उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. ही संख्या मोठी नाही. परंतु झालेले नुकसान शेतकऱ्यांना पेलवण्याच्या पलीकडे आहे. अशा शेतकऱ्यांचा सर्व्हे करून त्यांना योग्य ती मदत शासनाच्या माध्यमातून मिळायला हवी, अशी मागणी देखील यावेळी माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली.