पालखीतून थर्माकोल, प्लॅस्टिक हद्दपार, पारंपरिक द्रोण पत्रावळ्यांचा वापर सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2018 01:39 AM2018-07-14T01:39:59+5:302018-07-14T01:40:14+5:30
वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे पक्षीहि सुस्वरे आळविती तुका म्हणे होय मानसी संवाद आपुलाची वाद आपणासी या अभंगाद्वारे संतश्रेष्ठ तुकोबारायांनी सुमारे ४०० वर्षांपूर्वी निसर्गाचे महत्व विशद केले आहे. त्यांना त्या काळातच पर्यावरण संवर्धनाची जाणीव प्रकर्षाने झाली होती.
- प्रशांत ननवरे
वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे
पक्षीहि सुस्वरे आळविती
तुका म्हणे होय मानसी संवाद
आपुलाची वाद आपणासी
या अभंगाद्वारे संतश्रेष्ठ तुकोबारायांनी सुमारे ४०० वर्षांपूर्वी निसर्गाचे महत्व विशद केले आहे. त्यांना त्या काळातच पर्यावरण संवर्धनाची जाणीव प्रकर्षाने झाली होती. वरील अभंगाद्वारे तुकोबांनी अधोरेखित केलेले पर्यावरण जपण्याचे केलेले आवाहन दुर्लक्षित करुन चालणार नाही. राज्य शासनाने केलेली प्लॅस्टिकबंदी यंदा संतश्रेष्ठ तुकोबांच्या पालखी सोहळ्यात वारकरी भाविकांनी जपली आहे. दिंड्यांमधुन थर्माकोल, प्लॅस्टिकच्या थाळ्या वाट्यांना मूठमाती देण्यात आली आहे. पारंपरिक द्रोण पत्रावळ्यांचा वापर सुरु सोहळ्यात झाला आहे. याबाबत पालखी सोहळा प्रमुख अभिजित मोरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना माहिती दिली.
सोहळाप्रमुख मोरे यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, ४०० वर्षांपूर्वी संतश्रेष्ठ तुकाराममहाराजांना पर्यावरणाचे महत्व समजले होते. त्यांनी त्यावेळी रचलेल्या अभंगांतून याबाबत माहिती दिली होती. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने केलेल्या प्लॅस्टिकबंदीचे संस्थानासह वारकरी भाविकांच्या वतीने स्वागत करण्यात आले आहे. पावसापासून वापरण्यात येणारा कागद वगळता सोहळ्यात वारकरी भाविकांनी प्लॅस्टिकबंदीची प्रभावीपणे अंमलबजावणी केली आहे. त्यासाठी जेवण, अल्पोपहार करण्यासाठी वापरात असणारी प्लॅस्टीक आणि थर्माकोलची ताटे पुर्णपणे वापर थांबविण्यात आला आहे. तसेच, सक्षम दिंड्यांमध्ये स्टील ताटे, वाट्यांचा वापर करण्यात येत आहे. तर काही ठिकाणी पारंपरिक पत्रावळ्यांचा वापर करीत आहेत.
संत तुकाराम महाराज यांचा यंदाचा ३३३ वा पालखी सोहळा आहे. यावर्षी वारीमध्ये ३३० दिंड्या सहभागी झाल्या आहेत. तर ३ .५० ते ३.७५ लाख वारकरी तुकोबारायांच्या पालखी सोहळ््यासोबत चालत आहेत. निर्मल वारी अभियानाचे देखील संस्थानाच्या वतीने स्वागत करण्यात आले आहे. स्वच्छतागृहाच्या सुविधेमुळे उघड्यावर शौचास जाण्याचे प्रमाण थांबले आहे. प्रत्येक ठीकाणी २५ एकराचा पालखी तळ मिळावा, अशी मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे सर्व दिंड्या एकत्रित केंद्रीत होण्यास मदत होईल. गेल्या दोन वर्षांपासुन याबाबत पाठपुरावा सुरु आहे. त्यापैकी पुणे जिल्ह्यातील लोणी काळभोर, अंथुर्णेसह अकलुजच्या पुढील मुक्कामी असणाऱ्या बोरगांव येथे जागा मिळाल्या आहेत.
शासनाकडे मागणी केल्याप्रमाणे प्रत्येक तळावर सगळ्या विभागाचे अधिकारी उपलब्ध आहेत. त्या सर्वांकडे वॉकीटॉकी उपलब्ध आहेत. त्यामुळे जलद गतीने समन्वय साधुन कोणतीली समस्या सोडविण्यास मदत होते. शासनाच्या वतीने सोयीसुविधांबाबत चांगला पाठपुरावा सुरु आहे, असे सोहळा प्रमुख मोरे यांनी सांगितले.