उड्डाणपुलाखालील जागांचा वापर सुरूच
By admin | Published: June 27, 2017 07:57 AM2017-06-27T07:57:11+5:302017-06-27T07:57:11+5:30
शहरातील उड्डाणपुलाखालच्या जागांवर करण्यात आलेली अतिक्रमणे दूर करून त्या जागा तातडीने खाली कराव्यात, असे निर्देश उच्च न्यायालयाने
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहरातील उड्डाणपुलाखालच्या जागांवर करण्यात आलेली अतिक्रमणे दूर करून त्या जागा तातडीने खाली कराव्यात, असे निर्देश उच्च न्यायालयाने २००८ मध्ये दिले होते. न्यायालयाच्या या आदेशानंतर काही दिवस त्याची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न पुणे महापालिकेकडून करण्यात आला, आता मात्र या आदेशाचाच महापालिकेला विसर पडला आहे.
शहराच्या विविध भागांमध्ये महापालिकेकडून उड्डाणपूल उभारण्यात आले आहेत, तसेच काही ठिकाणी उड्डाणपूल उभारण्याचे काम सुरू आहे. उड्डाणपूल उभा राहिल्यानंतर त्याखालच्या रिकाम्या जागांवर बेवारस वाहने लावली जातात. त्याचबरोबर पथारी व्यावसायिकांकडूनही तिथे अतिक्रमण केले जाते. अनेक उड्डाणपुलाखालील जागांचा वापर अनधिकृतपणे सुरू आहे. या जागांचा मोठ्या प्रमाणात गैरवापर होत असल्याने त्या खाली करण्याचे आदेश न्यायालयाकडून देण्यात आले होते.
उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पुणे महापालिकेने सर्व उड्डाणपुलाखालच्या जागा ताब्यात घेऊन त्या बंदिस्त करणे आवश्यक होते. मात्र महापालिकेकडून तशी कार्यवाही झालेली नाही.
त्यामुळे अनेक ठिकाणी अनधिकृतपणे या जागांचा वापर सुरू आहे. जागा व्यापल्या जाण्याबरोबरच त्याच्या गैरवापरामुळे त्या ठिकाणाला बकाल स्वरूप प्राप्त होत आहे. मुंढवा खराडी नदीच्या पुलाखाली तर अनधिकृतपणे गोवऱ्यांचा
व्यवसाय सुरू आहे. उड्डाणपुलाखालच्या या बकालपणामुळे शहराचे विद्रूपीकरण झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
नाशिक महापालिकेने शहरातील काही उड्डाणपुलाखालच्या जागांवर छोटे बगीचे विकसित केले आहेत, त्यामुळे उड्डाणपुलाखाली बकालपणाऐवजी सुशोभीकरण झाल्याचे दिसून येत आहे. त्यानुसार महापालिकेने उड्डाणपुलाखालच्या जागा अतिक्रमणमुक्त करून न्यायालयाच्या आदेशाचे पालन करावे, अशी मागणी स्वयंसेवी संस्थांकडून करण्यात येत आहे.