सिमेंट रस्त्यांसाठी पाणी वापराबाबत टोलवाटोलवीच
By admin | Published: March 17, 2016 03:24 AM2016-03-17T03:24:53+5:302016-03-17T03:24:53+5:30
जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनंतरही शहरातील सिमेंटच्या रस्त्यांचे काम थांबविण्याबाबत महापालिका प्रशासनाकडून टोलवाटोलवी केली जात आहे.
पुणे : जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनंतरही शहरातील सिमेंटच्या रस्त्यांचे काम थांबविण्याबाबत महापालिका प्रशासनाकडून टोलवाटोलवी केली जात आहे.
शहरातील नगरसेवकांना प्रभागनिहाय मिळालेले बजेट खर्च करण्यासाठी चांगले डांबरी रस्ते उखडून सिमेंटचे रस्ते बांधण्याचे मोठे लोण शहरात पसरले आहे. ३१ मार्चपूर्वी हा निधी खर्ची पाडायचा असल्याने सध्या या कामांनी अधिकच वेग पकडला आहे. या सिमेंट रस्त्यांसाठी मोठ्या प्रमाणात पिण्याचे पाणी वापरले जात आहे. सिमेंटच्या रस्त्यांची कामे तातडीने थांबवून ती पावसाळ््यानंतर केली जावीत, अशी मागणी स्वयंसेवी संस्थांकडून करण्यात आली आहेत.
महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले, ‘सिमेंटच्या रस्त्यांची कामे अर्ध्यातूनच थांबविता येणार नाहीत. मात्र या कामांसाठी पिण्याचे पाणी वापरले जाऊ नये याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.’
महापौर प्रशांत जगताप म्हणाले, ‘येत्या ३१ मार्चपूर्वी सिमेंटच्या रस्त्यांची कामे संपवावीत. नवीन कामे हाती घेतली जाऊ नयेत, अशा सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.’
महापालिकेच्या हेल्पलाइन क्रमांकावर सिमेंटच्या रस्त्यासाठी पिण्याचे पाणी वापरले जात असल्याच्या अनेक तक्रारी येत आहेत. मात्र प्रशासनाकडून मात्र त्यावर काहीच हालचाल होताना दिसत नाही. शहराच्या पाण्यात कपात करण्यात आल्यामुळे अनेक भागांना पुरेसा पाणीपुरवठा होत नाही.