आपल्या मताचा योग्य वापर करा : सोनम वांगचुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 11:20 IST2025-02-10T11:18:27+5:302025-02-10T11:20:19+5:30

- हवा व पाण्याला कांद्याचा दर्जा देण्याचे आवाहन आपल्या मताचा योग्य वापर करा

Use your vote wisely: Sonam Wangchuk | आपल्या मताचा योग्य वापर करा : सोनम वांगचुक

आपल्या मताचा योग्य वापर करा : सोनम वांगचुक

- हिरा सरवदे 

पुणे : कांद्याचे भाव वाढले म्हणून देशातील नागरिकांनी सरकार बदलले. माणूस कांद्याशिवाय जगू शकतो. मात्र, शुद्ध हवा व पाण्याशिवाय जगू शकत नाही. आज पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास होत आहे. त्यामुळे हवा आणि पाण्याची समस्या निर्माण होत आहे. नागरिकांनी जे कांद्यासाठी केले, ते आज आपण हवा आणि पाण्यासाठी केले पाहिजे. यासाठी आपण आपल्या मताचा योग्य वापर करणे गरजेचे आहे, असे मत लडाखचे शिक्षण सुधारक व पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी व्यक्त केले.

पुण्यातील नद्या वाचवण्यासाठी, त्यांच्या स्वच्छतेसाठी नागरिकांनी उभ्या केलेल्या ‘पुणे रिव्हर रिव्हायवल’ चळवळीला पाठिंबा देण्यासाठी सोनम वांगचुक रविवारी पुण्यात आले होते. यानिमित्ताने फ्रेंड्स ऑफ लडाख, ‘फ्रेंड्स ऑफ नेचर पणे’तर्फे गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्थेत सोनम वांगचुक यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुंबई येथील डी. जे. फाउंडेशनचे दिलीप जैन, नॅशनल अलायन्स ऑफ पीपल्स मूव्हमेंटचे संतोष ललवाणी, गुरुदास नूलकर, प्रीती मस्तकर यांच्यासह पर्यावरणप्रेमी व विद्यार्थी उपस्थित होते.

सोनम वांगचुक म्हणाले, ‘कांद्याची भाववाढ झाल्यानंतर सरकारला सत्तेतून खाली खेचणारे भारतीय स्वच्छ पाणी, शुद्ध हवा या मुद्द्यांवरून सरकारला धारेवर का धरत नाहीत, ‘सुरा भोसकणारा मोठा गुन्हेगार असतो, त्याप्रमाणे आपल्या भोगवादी, चंगळवादी जीवनशैलीमुळे स्वतःसह इतरांचेही आयुष्य अनैसर्गिकपणे घटविणाराही गुन्हेगार नाही का,’असे सवाल वांगचुक यांनी उपस्थित केले.

आजच्या परिस्थितीमध्ये धर्माला अद्ययावत करणे गरजेचे आहे की नाही, हे प्रत्येकाने आपापल्या धर्मगुरूंना विचारायला हवे. दहा-वीस हजार वर्षांपूर्वी झालेल्या हिंसेचा दाखला धर्मगुरू देतात. नवीन संदेश नसल्याने युरोपमध्ये चर्च मोकळे पडत आहेत. आपल्याकडे दंगे लावले जातात, त्यामुळे धर्म स्थळांना थोडी फार गर्दी आहे. हे चित्र बदलण्यासाठी आपण बॅलेटचा आणि वॉलेटचा योग्य वापर करणे गरजेचे आहे. त्यासाठी आपले मत योग्य पद्धतीने देणे आणि सिमेंटचा वापर घरांसाठी न करणे, गरजेचे आहे, असे म्हणत वांगचुक यांनी पुण्यातील मुळा-मुठा नदीसुधार प्रकल्पाला विरोध दर्शवित नदी पुनरुज्जीवन चळवळीला पाठिंबा दर्शविला. 

Web Title: Use your vote wisely: Sonam Wangchuk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.