Pune Oxygen Shortage : उशाला ऑक्सिजन प्लांट, तरीही पुण्याला हजारो किलोमीटरचा हेलपाटा मारून आणावा लागतोय ऑक्सिजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:08 AM2021-04-29T04:08:57+5:302021-04-29T11:04:44+5:30

शासनाच्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या तिरपागड्या आदेशामुळे पुण्यातील कोरोना रुग्णांचा जीव टांगणीला...

Pune Oxygen Shortage: Near a oxygen plant, but still has to bring oxygen by thousands kilometers of journey | Pune Oxygen Shortage : उशाला ऑक्सिजन प्लांट, तरीही पुण्याला हजारो किलोमीटरचा हेलपाटा मारून आणावा लागतोय ऑक्सिजन

Pune Oxygen Shortage : उशाला ऑक्सिजन प्लांट, तरीही पुण्याला हजारो किलोमीटरचा हेलपाटा मारून आणावा लागतोय ऑक्सिजन

Next

पुणे : पुणे जिल्ह्यासाठी लागणार ऑक्सिजन जिल्ह्यातील चाकण येथून उपलब्ध होणे सहज शक्य असताना शासनाच्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या तिरपागड्या आदेशामुळे पुण्यातील कोरोना रुग्णांचा जीव टांगणीला लागला आहे. गेल्या आठ-दहा दिवसांपासून पुण्यासाठीचा ७०-७५ टन ऑक्सिजन हजारो किलो मीटरचा प्रवास करून आणावा लागत आहे.

पुण्यातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येसोबतच ऑक्सिजनच्या मागणीतदेखील मोठी वाढ झाली आहे. पुणे जिल्ह्याची ऑक्सिजनची मागणी २५० मे.टन वरून थेट ३७०-३७५ मे. टनांपर्यंत गेली आहे. आतापर्यंत पुण्यासाठीचा हा ऑक्सिजन पुरवठा ९० टक्के चाकण येथून होत होता. परंतु आठ दिवसांपूर्वी शासनाच्या अन्न व औषध प्रशासन विभागाने आदेश काढून पुण्याचा कोट्यात बदल केला. यामुळेच आता पुण्यासाठी आवश्यक असलेला ७०-७५ मे.टन ऑक्सिजन जामनगर, बेल्लारी आणि थेट विशाखापट्टणम येथून आणावा लागत आहे. पुण्यातील चाकण येथून नाशिक, नगर आणि मराठवाड्याला पुरवठा करण्यात येत आहे.

राज्यपातळीवर निर्णय झाल्याने गोंधळ

ऑक्सिजनचा तुटवडा भासू लागल्याने पुरवठ्यासाठी राज्य पातळीवर निर्णय घेतला गेला. पुण्यासाठी चाकण येथील प्लंटमधून ३०० मेट्रिक टन ऑक्सिजन मिळत आहे. मात्र, पुण्याची गरज ३७० ते ३७५ टनांची असल्याने प्रशासनाला तूट भरून काढण्यासाठी प्रयत्न करावे लागत आहेत.

विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांची धावपळ

गेल्या आठ-दहा दिवसांपासून विभागीय आयुक्त सौरभ राव आणि जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांना वेगळेच काम लागले आहे. ऑक्सिजन टँकर निघाले का, ऑक्सिजनसाठीचे विमान वेळेवर पोहचले का, विमान उड्डाणाला काही अडचण तर नाही ना, ऑक्सिजन प्लंटमध्ये पुण्यासाठीच्या टँकरचा नंबर अगोदर कसा लागेल आणि हजारो किलोमीटरचा प्रवास करून आवश्यक ऑक्सिजन पुण्यात वेळेवर कसा पोहोचले यासाठी दिवसरात्र धावपळ उडत आहे.

------

पुण्यातील ऑक्सिजनसाठी करावा लागतो एवढा प्रवास

- जामनगर लिंडे - ३० मे.टन ऑक्सिजन: प्रवास ९३३ ,किलोमीटर ( वेळ- १७ तास)

- जेएसडब्ल्यू, बेल्लारी- २२ मे.टन ऑक्सिजन: प्रवास ५९० किलोमीटर (वेळ १३ तास)

- विशाखापट्टणम : २० मे.टन ऑक्सिजन: प्रवास ११९७ किलोमीटर ( २२ तास)

Web Title: Pune Oxygen Shortage: Near a oxygen plant, but still has to bring oxygen by thousands kilometers of journey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.