योगेश समसी यांना उस्ताद मेहबूब खानसाहेब मिरजकर पुरस्कार जाहीर; २३ डिसेंबरला पुण्यात सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 04:02 PM2017-12-18T16:02:13+5:302017-12-18T16:06:10+5:30
संगीत क्षेत्रात आपल्या तबला वादनाने वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या कलाकारांना ताल विश्वच्या वतीने गौरविण्यात येते. यावर्षी प्रसिद्ध तबला वादक पं. योगेश समसी यांना ‘उस्ताद मेहबूब खानसाहेब मिरजकर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
पुणे : संगीत क्षेत्रात आपल्या तबला वादनाने वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या कलाकारांना ताल विश्वच्या वतीने गौरविण्यात येते. यावर्षी प्रसिद्ध तबला वादक पं. योगेश समसी यांना ‘उस्ताद मेहबूब खानसाहेब मिरजकर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असून, ‘संगीत विरासत’ या कार्यक्रमाचे आयोजन २३ डिसेंबर २०१७ रोजी सायंकाळी साडे-पाच वाजता आबासाहेब गरवारे महाविद्यालय हॉल येथे करण्यात आले आहे, अशी माहिती तालविश्वचे नवाझ मिरजकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. यावेळी रिजवान मिरजकर, केतन बडवे, श्रीकांत मेस्त्री आदी मान्यवर उपस्थित होते.
उस्ताद मेहबूब खानसाहेब मिरजकर यांच्या ५२व्या तर गुरु उस्ताद मोहम्मद हनीफ खान मिरजकर यांच्या तिसऱ्या स्मृतीप्रित्यर्थ ‘तालविश्व’च्या वतीने ‘संगीत विरासत’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात प्रसिद्ध तबलावादक पं. योगेश समसी व त्यांचेच शिष्य यशवंत वैष्णव यांची जुगलबंदी रंगणार आहे तर, पं. शौनक अभिषेकी आपल्या स्वरांनी रसिकांना भिजवणार असून त्यांना नवाझ मिरजकर तबल्यावर साथ देणार आहेत.