¦गुटखा बंदी कागदावरच...एक कोटींचा माल पोलिसांकडून जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2020 04:19 AM2020-12-03T04:19:47+5:302020-12-03T04:19:47+5:30
पुणे : राज्य शासनाने गुटख्यावर बंदी घातली असली तर त्याचे उत्पादन इतर राज्यात होत असल्याने त्याचा कोणताही ...
पुणे : राज्य शासनाने गुटख्यावर बंदी घातली असली तर त्याचे उत्पादन इतर राज्यात होत असल्याने त्याचा कोणताही परिणाम राज्यात गुटखा विक्रीवर झाला असून उलट गुटखा विक्रेत्यांना त्याच्या काळाबाजारातून अधिक फायदा होत असल्याचे दिसून येत आहे. या वर्षभरात पुणे पोलिसांनी गुटखा विक्री केल्याप्रकरणी तब्बल ८५ गुन्हे दाखल केले असून ९८ जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून ९५ लाख ६८ हजार ४९३ रुपयांचा माल जप्त केला आहे. गेल्या वर्षी गुटखा विक्री केल्याप्रकरणी ४ गुन्हे दाखल करुन ४ जणांना अटक केली होती. त्यांच्याकडून ५ लाख ५२ हजार ४२० रुपयांचा माल जप्त करण्यात आला होता.
राज्यात गुटखा बंदी असली तरी आता शहरातील जवळपास सर्व पानटपरीवर गुटखा मिळतो. काही पान टपरीचालक गुटखा ठेवत नाहीत. पानटपरीचालक कोणीही मागणी केली तर त्याला गुटखा नाही असेच प्रथम सांगतात. नेहमी घेणारा असलेल्यांनाच काही न बोलता गुटख्याच्या पुड्या दिल्या जातात. बहुतांश पान टपरी चालकांना त्यांच्या नेहमीचा ग्राहक कोणत्या कंपनीचा गुटखा घेतो, याची आता माहिती झालेली असते. त्यामुळे ग्राहक समोर आल्यावर तो फक्त हाताने किती पुड्या पाहिजे, हे दर्शवितो. त्यानुसार पानटपरी चालक खाली एखाद्या पिशवीत ठेवलेल्या पुड्या काढून देतो.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या आदेशावरुन शहर पोलिसांनी १९ नोव्हेंबर रोजी शहरात बेकायदेशीर गुटखा विक्री करणार्याविरुद्ध मोहीम हाती घेतली. एकाच दिवसात ठिकठिकाणी छापे घातले. त्यात ३१ गुन्हे दाखल करुन ४२ जणांवर कारवाई केली. त्यांच्याकडून ४७ लाख ९६ हजार २०८ रुपयांचा माल जप्त केला. जानेवारीपासून ६ नोव्हेंबरपर्यंत पोलिसांनी जेवढी कारवाई केली होती. जवळपास तेवढीच कारवाई पोलिसांनी एकाच दिवसात केली यावरुन शहरात किती उघडपणे गुटखा विकला जात आहे, याचा अंदाज येऊ शकतो.
.................
देशभरातून गुटखा उत्पादन बंद करा
महाराष्ट्रात गुटखा बंदी करुन काही उपयोग नाही. केंद्र सरकारने देशभरात तंबाखु उत्पादनावर काही वर्षांचा कालावधी ठरवुन बंदी घालावी. गुटखा व्यवसायात अंडरर्वल्डने प्रवेश केला आहे. त्यामुळे सरकारने संपूर्ण देशभरात गुटखा उत्पादनावर बंदी घातली तरच या व्यसनाला आपण पायबंद घालू शकू.
डॉ. कल्याण गंगवाल
.............
गुटखा कारवाई २०१९ २०२०
एकूण गुन्हे ४ ८५
अटक आरोपी ४ ९८
जप्त माल ५५२४२० ९५६८४९३