रसिकांनी अनुभवली ‘दमा’ शैली!; पुण्यात ‘उत्सव पुस्तकांचा, जागर वाचनाचा’ प्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2018 12:30 PM2018-01-08T12:30:19+5:302018-01-08T12:36:45+5:30

=अक्षरधारा बुक गॅलरीतर्फे संयोजित आणि डॉ. डी. वाय. पाटील कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालयातर्फे आयोजित ‘उत्सव पुस्तकांचा, जागर वाचनाचा’ या विशेष ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांच्या हस्ते झाले.

'Utsav Pustakancha, Jagar Vachanacha' exhibition In Pune | रसिकांनी अनुभवली ‘दमा’ शैली!; पुण्यात ‘उत्सव पुस्तकांचा, जागर वाचनाचा’ प्रदर्शन

रसिकांनी अनुभवली ‘दमा’ शैली!; पुण्यात ‘उत्सव पुस्तकांचा, जागर वाचनाचा’ प्रदर्शन

Next
ठळक मुद्देरसिकांनी घेतला ‘भानाचे भूत’ या कथेचा आस्वादमाणसातील माणूसपण जपण्यासाठी कसदार ललित साहित्याच्या निर्मितीची गरज : अच्युत गोडबोले

पुणे : कथाकथनातून डोळ्यांसमोर हुबेहूब उभी राहणारी पात्रे, ग्रामीण भाषेतील लकबीतून होणारी संवादफेक, प्रेक्षकांनी मनमुराद हसत दिलेली दाद, सभागृहात फुललेला हास्यफुलोरा अशा रंगलेल्या वातावरणात ‘भानाचे भूत’ ही कथा ‘दमा’ शैलीतून उलगडत गेली. ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार यांनी शेतकरी आणि गावातील लोकांची विनोदगाथा उत्तम प्रकारे कथेतून मांडली. नव्वदीच्या उंबरठ्यावर असलेले ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार यांचे ‘तारुण्य’ या वेळी उपस्थितांना थक्क करून गेले. 
आचार्य अत्रे सभागृहात अक्षरधारा बुक गॅलरीतर्फे संयोजित आणि डॉ. डी. वाय. पाटील कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालयातर्फे आयोजित ‘उत्सव पुस्तकांचा, जागर वाचनाचा’ या विशेष ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन रविवारी डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांच्या हस्ते झाले. त्या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मिरासदार होते. 
प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध लेखक अच्युत गोडबोले उपस्थित होते. या वेळी द. मा. मिरासदार यांनी सांगितलेल्या ‘भानाचे भूत’ या कथेचा आस्वाद रसिकांनी घेतला. 
‘बदलत्या काळातील विविध आव्हानांचा सामना सगळ्याच भाषांमधील साहित्याला करावा लागत आहे. साहित्य हे मानवी जीवन उन्नत करणारे एक प्रभावी माध्यम असून समाजातील दानशूरांनी साहित्यिक उपक्रमांच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे’, असे आवाहन द. मा.नी केले.
रसिका राठीवडेकर यांनी प्रास्ताविक केले. सिद्धार्थ बेंद्रे यांनी सूत्रसंचालन केले. रमेश राठीवडेकर यांनी आभार मानले. 


डॉ. पी. डी. पाटील म्हणाले की, ‘साहित्य क्षेत्रात प्रचंड चढउतार सुरू असून कसदार पुस्तकांच्या आवृत्या निघणे बंद झाले आहे. मराठी प्रकाशन व्यवसायाला नवसंजीवनी आणि चैतन्य प्राप्त करून देणे गरजेचे आहे. सध्याची पिढी आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करून आॅनलाइन सुविधेचा लाभ घेत आहे. मात्र, त्यामुळे पुस्तकांच्या दुकानात सहकुटुंब जाऊन खरेदी करण्याचा आणि नव्या कोºया पुस्तकांचा दरवळ अनुभवण्याचा आनंद ही पिढी गमावते आहे. वाचन संस्कृती टिकवायची आणि वाढवायची असेल तर कसदार लेखक आणि कवींची फळी निर्माण करावी लागेल.’

गोडबोले म्हणाले, ‘ललित आणि विज्ञान असे साहित्याचे दोन प्रकार करून त्यामध्ये डावे-उजवे करणे ही खेदाची बाब आहे. माणसातील माणूसपण जपण्यासाठी कसदार ललित साहित्याच्या निर्मितीची गरज आहे. अस्सल ललितलेखनाची निर्मिती आणि त्याचे प्रकाशन या दोन्ही बाबतींत आग्रही राहणे गरजेचे आहे. सामाजिक परिस्थितीचे प्रतिबिंब साहित्यात उमटले पाहिजे. बदलत्या तंत्रज्ञानाचा अंगीकार साहित्य क्षेत्राशी संबंधित सर्व घटकांनी केला पाहिजे.’ 
 

Web Title: 'Utsav Pustakancha, Jagar Vachanacha' exhibition In Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.