पुण्यातील उत्तमनगरमध्ये गुंडावर गोळीबाराचा थरार; एका पाठोपाठ एक झाडल्या ६ गोळ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2021 11:58 IST2021-08-09T10:53:04+5:302021-08-09T11:58:18+5:30
पूर्ववैमनस्यातून घडला हा प्रकार; कारच्या काचेतून आरपार घुसून गोळी पाठीला लागली

पुण्यातील उत्तमनगरमध्ये गुंडावर गोळीबाराचा थरार; एका पाठोपाठ एक झाडल्या ६ गोळ्या
पुणे : पूर्ववैमनस्यातून निलेश गायकवाड व त्याच्या साथीदारांनी पाठालाग करुन दुसर्या गुंडाच्या कारवर गोळीबार करुन त्याला जखमी करण्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार शिवणे येथील स्मशान भूमी ते एनडीए रोड दरम्यान रविवारी रात्री पावणेदहा वाजता हा थरार रंगला होता.
याप्रकरणी केदार शहाजी भालशंकर (वय २४, रा. रामनगर, वारजे) याच्या पाठीत गोळी घुसून त्यात तो जखमी झाला आहे. भालशंकर याच्या फिर्यादीवरुन उत्तमनगर पोलिसांनी निलेश गायकवाड व त्याच्या तीन ते चार साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केदार भालशंकर व त्याचे मित्र हर्षवर्धन मोहिते व आकाश शिंदे हे कारमधून रविवारी रात्री पावणेदहा वाजता घरी जात होते. केदार भालशंकर हा गाडी चालवत होता. त्यावेळी शिवणे स्मशान भूमी ते एनडीए रोड दरम्यान निलेश गायकवाड व त्याचे तीन ते चार साथीदार ३ दुचाकीवरुन आले. त्यांनी भालशंकर याच्या गाडीचा पाठलाग करुन त्यांच्यावर फायरिंग केले. त्यांनी एका पाठोपाठ एक अशा ६ गोळ्या झाडल्या. त्यातील एक गोळी कारच्या मागील बाजूच्या काचेतून आरपार शिरुन भालशंकर याच्या पाठीत घुसली. त्यात तो जखमी झाला. शिवणे स्मशानभूमी ते एनडीए रोड दरम्यान हा पाठलाग सुरु होता. यावेळी रस्त्याने जाणार्या येणार्या लोकांना या टोळक्याने पळवून लावून दहशत निर्माण केली.
या घटनेची माहिती मिळाल्यावर उत्तमनगर, वारजे माळवाडी पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिली असून उत्तमनगर पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मांडवी खुर्द येथील सरपंदाच्या निवडणुकीत बिनविरोध निवडून येण्यासाठी धमकाविल्याच्या प्रकरणात उत्तमनगर पोलिसांनी जानेवारीमध्ये गुन्हा दाखल करुन काही जणांना अटक केली होती़ त्यात केदार भालशंकर हाही एक आरोपी होता.