उत्तरा-पूर्वा, हस्त नक्षत्रांत पाऊस पडेल
By Admin | Published: February 16, 2017 02:56 AM2017-02-16T02:56:43+5:302017-02-16T02:56:43+5:30
यंदा उत्तरा-पूर्वा, हत्तीचा पाऊस चार खंडांत पडेल, जनतेचे समाधानकारक होईल, बाजरीचे पीक येईल, तर गाईगुरे, शेळीमेंढी
खळद : यंदा उत्तरा-पूर्वा, हत्तीचा पाऊस चार खंडांत पडेल, जनतेचे समाधानकारक होईल, बाजरीचे पीक येईल, तर गाईगुरे, शेळीमेंढी यांच्यामागची रोगराई हटेल; पण माणसाला मात्र साधारण रोगराईला सामोरे जावे लागेल, अशी भाकणूक (भविष्यवाणी) आज पंचामीच्या दिवशी श्रीक्षेत्र वीर येथे श्रीनाथ म्हस्कोबा व माता जोगेश्वरी यांच्या वार्षिक यात्रेत देवाचे मानकरी तात्या बुरुंगले यांनी केली.
श्रीक्षेत्र वीर येथे शुक्रवार (दि. १०) माघ शु. पौर्णिमेपासून श्रीनाथ म्हस्कोबा व माता जोगेश्वरी यांच्या दहा दिवसांच्या वार्षिक यात्रेला सुरुवात झाली. आजपासून पंचमीच्या दिवशी भाकणुकीला, नवसाचे व कुळाचाराप्रमाणे गज-गोपाळ (जेवण) घालण्यास सुरुवात झाली. तर, उद्यापासून मारामारीपर्यंत तात्या बुरुंगले, दादा बुरुंगले, लक्ष्मण शिंगाडे यांची भाकणूक होईल.
आज पहाटे ४ वाजता पूजा होऊन मुख्य गाभारा बंद करण्यात आला. सकाळी ६ वाजता दर्शनासाठी पुन्हा तो खुला करण्यात आला. ११ वाजता विश्रांतीसाठी पुन्हा बंद करण्यात आला. ११.३० वाजता दर्शनासाठी पुन्हा खुला करण्यात आला. एक वाजण्याच्या सुमारास मानाच्या कोडीत, कण्हेरी, राजेवाडी, भोंडवेवाडी, पुणे, वीर, वाई, सोनवडी या पालख्या व २२ काठ्या देऊळवाड्यात आल्या.
एका कोपऱ्यात सव्वा महिन्याचा खडा पडेल, एका कोपऱ्यात एक महिन्याचा खडा पडेल, एका कोपऱ्यात पाऊण महिन्याचा खडा पडेल तर एक ा कोपऱ्यात बळीच्या घासाला पुरणार नाही. एका कोपऱ्यात सव्वा शेर उत्पन्न निघेल, एका कोपऱ्यात एक शेर उपन्न निघेल, एका कोपऱ्यात पाऊण शेर उपन्न निघेल. तर, एका कोपऱ्यात दुष्काळ पडेल व ज्याची गादी त्याला मिळेल. गादीचा मालक गादीवर येईल. गाईगुरांना, शेळ्यामेंढ्यांची रोगराई हटेल व मनुष्याच्या मागे मात्र खातापिता आटापिटा राहील, अशी भविष्यवाणी या वेळी करण्यात आली.
मंगळवार (दि.२१) माघ वद्य दशमी (मारामारी) हा यात्रेचा शेवटचा मुख्य दिवस आहे. या दिवशी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविकांची मोठी गर्दी होते. त्या दृष्टीने सर्व तयारी केल्याचे देवस्थानाचे अध्यक्ष बाळासाहेब धुमाळ, सचिव तय्यद मुलाणी, उपाध्यक्ष संभाजी धुमाळ, विश्वस्त दिलीप धुमाळ, मंगेश धुमाळ, ज्ञानेश्वर धुमाळ, नामदेव जाधव, बबन धसाडे, अशोक वचकल, सुभाष समगीर यांनी सांगितले.